सांगली, 26 मार्च : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेल्या या कारवाईनंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी एका मुलाखतीत एक मोठं विधान केलं आहे. “मंत्र्यांना बायको किंवा मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम असणारा पीए अडचणीत आणतो” असं विधान नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत केलं आहे. सांगलीचे आमदार सुधीर घाडगे यांच्या श्री पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी पेढीचा 190 वा वर्धापन दिन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत सांगलीत पार पडला. त्यानिमित्ताने मंत्री नितिन गडकरी यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. नितीन गडकरी म्हणाले, मी आणि नरेंद्र मोदी एका विचाराचे आहोत. की, आमदाराच्या पोटातून आमदार तयार झाला नाही, खासदाराच्या पोटातून खासदार तयार झाला नाही पाहिजे. मंत्र्याच्या पोटातून मंत्री तयार झाला नाही पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, कुणाचा मुलगा आहे म्हणून नाही. जनतेने म्हणावं की याला तिकीट मिळावं तर जरूर द्या पण त्याच्या आई-वडिलांनी म्हणावं की माझ्या मुलाला तिकीट द्या तर नाही. त्यामुळेच भाजपचा अध्यक्ष असताना मी अनेकदा वाईटपणा घेतला.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, “माझ्या घरी खूप चांगले आहे. माझी मुलं राजकारणात नाहीयेत ते कुणाला माझा परिचय सांगत नाहीत. माझी पत्नी आहे तिचं फिल्ड वेगळं आहे. तिच्या कामात मी हस्तक्षेप करत नाही माझ्या कामात ती हस्तक्षेप करत नाही. एकदा चुकून माझा मेव्हणा आला आणि ती म्हणाली याचं काही काम आहे. माझा एक अनुभव आहे की, मंत्र्यांना अडचणीत आणतं कोण? तर बायको… नाहीतर मेहुणा आणि नाही तर चहापेक्षा किटली गरम म्हणजे खासगी सचिव. मी माझ्या मेहुण्याला बोलवलं आणि म्हटलं की तुझं काम असेल तर माझ्याकडे ये. लोकांची कामं घेऊन नेतेगिरी करण्याचा तुझा संबंध नाही, तू या भानगडीत पडायचं नाही”. वाचा : रिसॉर्ट तोडण्यासाठी ‘हातोडा’ घेऊन निघालेल्या किरीट सोमय्यांना अनिल परबांचे थेट आव्हान, म्हणाले ‘हिंमत असेल तर…’ राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाहीये. राजकारण हे धर्मकारण, समाजकारण आणि विकासकारण आहे. पूर्वी असं कुठे वातावरण नव्हतं जसं आज आहे. आजही शरद पवार साहेब आणि मी भेटलो तर ऊस, शेती, शेतकऱ्यांची स्थिती, एक्सपोर्ट या संदर्भात चर्चा होते. अनेक गोष्टी एकमेकांना सुचवतो. राजकारणात सत्ताकारणाच्या मर्यादा आहेत. राजकारणात आपण एकमेकांचे वैचारिक विरोधक आहोत दुश्मन नाही आहोत असंही नितीन गडकरी म्हणाले.