अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 11 मे: महात्मा गांधी यांच्या ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेत प्रत्येक गाव स्वयंपूर्ण व्हावे, असा विचार होता. हाच विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी वर्ध्यातील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र प्रयत्न करत आहे. केंद्राच्या वतीने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्यात येत आहेत. यात कचऱ्यापासून हातकागद आणि शोभेच्या वस्तू बनवल्या जात असून त्यांना मागणीही मोठी आहे. टाकाऊपासून टिकाऊ दत्तापूर येथे ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र आहे. येथील हात कागद उद्योग कचऱ्यातून कलेचा प्रेरणादायी संदेश देतो आहे. या ठिकाणी शाळा तसेच शासकीय कार्यालयातून येणाऱ्या वेस्ट कागदापासून बेस्ट वस्तू तयार केल्या जातात . भाजी मार्केटमधील वेस्ट पोते तसेच हे वेस्ट कागद एका मशीन मध्ये टाकून त्याच्यावर कागद बनवण्याची प्राथमिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर तयार झालेल्या लगद्यापासून वेगवेगळ्या मशीनच्या आधारे पुढील प्रक्रिया करून त्याचा कागद आणि उपयोगी आणि शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. त्यांची विक्री देखील केली जात आहेत.
कोणकोणत्या वस्तू बनविल्या जाताहेत ? आतापर्यंत बनवलेल्या विविध वस्तू याठिकाणी ठेवल्या आहेत. ज्यामध्ये कागदी पिशवी, शोभेचे घर, पेन पॉट, डस्टबिन, फाईल स्टँड, फुलदाणी, लेटर पॅड, फोटोफ्रेम यासह अन्य वस्तूंचा समावेश आहे. घेतलेल्या ऑर्डर नुसार या वस्तूंची विक्री देखील केली जाते. Wardha News: खासगी नोकरी सोडली अन् लावली आमराई, आता लाखोंची करतो कमाई, Video कधीपासून सुरू आहे स्तुत्य उपक्रम? राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या काळात सी एस व्ही म्हणजेच ग्रामोपयोगी केंद्राच्या वतीने हात कागद उद्योगाला सुरुवात झाली. डॉ.विभा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आजही ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण संस्कृती तसेच कला यांना चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता कागद उद्योगातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला असून या ठिकाणी बनविला जाणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या कलेला देखील महत्त्व प्राप्त होत आहे.