अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 8 मे: महाराष्ट्रात अनेक उच्च शिक्षित तरुण शेतीकडे वळत आहेत. वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगावचे उच्चशिक्षित शेतकरी अतुल कुरवाडे यांनी खासगी नोकरीचा मार्ग सोडून ऑरगॅनिक शेतीकडे मोर्चा वळवला. आंबा बागायत शेतीने कुरवाडे यांच्या आयुष्यात गोडवा आणला आहे. त्यांनी आपल्या पडित शेतीत विविध प्रजातींची तब्बल 1 हजार 400 झाडांची आमराई तयार केली आहे. उच्चशिक्षित तरुणाने सोडली नोकरी कुरवाडे हे तरुण शेतकरी बीएससी डी फार्म झालेत. त्यानंतर ते खासगी नोकरी करत होते. मात्र नोकरीत दिवसभर मेहनत करून समाधान न मिळाल्याने विचार आणि पावले शेतिकडे वळली. 2017 मध्ये वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये 1400 आंब्याची झाडे लावली. अवघ्या दोन वर्षातच त्यातील 350 झाडे आंब्यांनी बहरली व त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.
कोणत्या प्रजातीची केली लागवड? कुरवाडे यांनी 1400 झाडांमध्ये केशर, हैद्राबादी हापूस, दशहरी, बैंगन फल्ली, लाल बाग का राजा, गावरान अशा आंब्याच्या प्रजाती लावल्या. बाग फुलवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. झाडांची विशेष काळजी घेतली. अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळालं असून आज आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. त्यांना यामधून लाखोंचा फायदा होत आहे. शेतकऱ्याला कसा झाला फायदा ? कुरवाडे यांनी 6 वर्षापूर्वी त्यांच्या 5 एकर जमिनीमध्ये विविध प्रजातीच्या आंब्याची कलमं आणून लागवड केली. 2019 मध्ये त्यातील 350 झाडं बाहरली. पहिल्याच वर्षी कुरवाडे यांनी 3.5 लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. दरवर्षी उत्पन्न वाढतच गेले. यंदाची उलाढाल 6.5 ते 7 लाख रुपये पर्यंत जाईल असा त्यांना विश्वास आहे. इतरांनीही शेतीकडे वळावं असं आवाहन कुरवाडे यांनी केलंय. ‘तो’ उपाय अन् शेतात चित्रच बदललं,एका एकरात घेतलं पपईचं 50 टन उत्पादन, Video विदर्भात गावरान आंब्याची बाजारपेठ विदर्भात एकेकाळी गावरान आंब्याची मोठी बाजारपेठ होती. गावरान आंब्यामुळे विदर्भाची वेगळी ओळखही होती. मात्र आता आंब्याची ती प्रजाती कुठंतरी विलुप्त झालेली दिसते. याच गावरान आंब्याची देखील लागवड कुरवाडे यांनी त्यांच्या शेतीत केली आहे. वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न ते घेत आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही आंब्याची फळबाग फुलवणे फायदेशीर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.