अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 17 जून: शेतीला पुरक व्यवसाय म्हणून पूर्वापार पशुपालन केले जाते. सध्या दुधाला दर असल्यामुळे शेतकरी अधिक दूध देणाऱ्या म्हैस किंवा जर्शी गाई पाळण्याकडे वळत आहेत. त्यामुळे देशी गोवंश संकटात आला आहे. मात्र, योग्य नियोजन केल्यास देशी गवळाऊ गाईंचं संगोपन फायद्याचं ठरू शकतं. वर्ध्यातील नंदकिशोर गावंडे यांनी आपल्या 13 वर्षांपासूनच्या गोपालनातून हेच दाखवून दिलं आहे. देशी गवळाऊ गाई पाळून ते महिन्याला 50 हजारांहून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. डोंगराळ भागात 13 वर्षांपासून सुरू आहे गोपालन वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या डोंगराळ भागात आमगाव मदनी हे गाव आहे. या ठिकाणी नंदकिशोर गावंडे हे गेल्या 13 वर्षांपासून गवळाऊ गाईंचं संगोपन करत आहेत. त्यांनी सुरुवातीला 4 गाई घेतल्या होत्या. आता त्यांच्याकडे लहान मोठ्या मिळून 64 गवळाऊ गाई आहेत. देशी गोवंश सुधार व्यवसाय, गोपालन व्यवसाय, गो उत्पादन, ग्रामोद्योग, पंचगव्य उत्पादन, अशाप्रकारे हा व्यवसाय त्यांनी उत्तमरीत्या सांभाळला आहे.
ग्रामीण रोजगाराचे उदाहरण नंदू गावंडे यांचा गवळाऊ गोपालनाचा व्यवसाय ग्रामीण स्वयंरोजगाराचं उत्तम उदाहरण ठरत आहे. गावंडे यांच्या कुटुंबातील चार सदस्य याच व्यवसायत मदत करतात. तसेच यातून चार कुटुंबांना रोजगार मिळत आहे. गाईंची देखभाल करणे, गोठ्याची साफसफाई, दूध काढणे, दुधापासून दही, तूप, पेढा, पनीर अशा प्रकारच्या वस्तू बनविणे आणि मार्केटिंग या प्रक्रियांमुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. म्हणून सुरू केलं गोपालन व्यवसायिक स्वरुपात दुधाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने गवळाऊ गाईंची प्रजात संकटात आली. तेव्हा गावंडे यांनी या गोवंशाचे जतन करायचे या उद्देशाने 4 गाई घेऊन त्या सांभाळण्यास सुरुवात केली. गाईंची संख्या वाढत गेल्याने आता त्यांच्याकडे 64 गाई झाल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून देशी गोपालनाचा व्यवसाय करणे गरजेचे आहे, असे गावंडे सांगतात. नोकरी सोडली अन् घेतल्या गाई, म्हशी; शेतकरी पुत्र करतोय लाखोंची कमाई, Photos गावंडे यांना किती होते मिळकत? गावंडे यांना गवळाऊ गाईंच्या पालनातून चांगला नफा मिळत आहे. ते पंचगव्य निर्मिती करतात. गोमुत्र, शेण यासोबतच दूध व दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी आहे. यातून त्यांना दिवसाला 3 हजार रुपये तर महिन्याला जवळपास 50 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते. चार एकर शेती आणि चार गाई सांभाळल्या तर चार जणांचे कुटुंब चांगल्या पद्धतीनं जगू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी देशी गाईंच्या संगोपनाकडे वळावं, असं गावंडे सांगतात. व्यवसायाला सोशल मीडियाची जोड सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील गावंडे यांचा व्यवसाय भरारी घेताना दिसतो आहे. व्हाट्सअप किंवा ई-मेलच्या माध्यमातून गावंडे हे दूध आणि दुधापासून बनवलेल्या वस्तूंची ऑर्डर स्वीकारतात. ग्राहकांना ऑर्डरनुसार मागणी पूर्ण करून दिली जाते. कोरोना काळानंतर विषमुक्त आणि शुद्ध दुधापासून बनलेल्या वस्तूंची मागणी वाढली असल्याचे गावंडे यांनी सांगितले.