सध्याच्या काळामध्ये उच्च शिक्षणाला अधिक महत्त्व आहे. ग्रामीण भागातील पालकही उच्च शिक्षणासाठी मुलांना मोठ्या शहरांमध्ये पाठवत आहेत. लाखो रुपये खर्चून मुले उच्च शिक्षण घेत आहेत.
उच्च शिक्षण घेतले तरी तेवढ्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध नाहीत. बेरोजगारीमुळे हतबल झालेले उच्चशिक्षित तरुण शहरातच छोटी-मोठी नोकरी पत्करतात किंवा थेट गावाचा रस्ता धरतात.
बीड जिल्ह्यातील कडा गावच्या शेतकरी पुत्रानं मात्र एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. पंकज पाटील हा उच्च शिक्षित तरुण गावातच राहून लाखोंची उलाढाल करतोय. त्यानं दुग्ध व्यवसायालाच आपलं करियर म्हणून निवडलंय.
पंकज पाटील यानं विज्ञान शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 2007 ते 2009 या काळात दोन वर्षे छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहिरात कंपनीत काम केलं. मात्र, यातून त्याला वर्षाकाठी दोन लाख रुपयेच मिळू लागले. नोकरी परवडत नव्हती म्हणून पंकजनं राजीनामा दिला आणि गावाची वाट धरली.
पंकज पाटील यांना वडिलार्जित 24 एकर शेती आहे. त्यामुळे गावाकडे आल्यावर शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळत नव्हते. तेव्हा पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन सुरू केलं.
पंकज यांनी सुरुवातीला पाच गाई आणि पाच म्हशी घेतल्या व दुग्ध व्यवसाय सुरू केला. दिवसाकाठी चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे त्यांनी हाच व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला.
सध्या पंकज यांच्याकडे 40 गाई आणि 60 म्हशी आहेत. तर दररोज 400 ते 425 लिटर दुधाची विक्री होतेय. सर्व दूध शहरांमध्ये विक्री केले जाते. यातून त्यांना महिनाकाठी 1 लाख ते 1 लाख 20 हजार रुपये मिळत आहेत.
दुधाचा व्यवसाय वाढत असतानाच पंकज यांनी दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी श्रीखंड आणि पनीरची निर्मिती सुरू केली. दिवसाला 30 ते 35 किलो पनीर आणि 40 ते 50 किलो श्रीखंड ते बनवतात.
शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय सुरू केला. यामध्ये हळूहळू माझी प्रगती होत गेली. आता दिवसाकाठी 400 ते 425 लिटर इतके दूध मिळत आहे. यातून वर्षाकाठी तेरा ते पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मला मिळत आहे, असे पंकज यांनी सांगितले.