वर्धा, 23 जुलै: शेतीसाठी पाणीपुरवठ्याची सोय गरजेचीच असते. त्यामुळे विदर्भातील लाल नाला प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला गेला. पण या प्रकल्पाचा वर्धा जिल्ह्यातील 40 गावच्या शेतकऱ्यांना धोका निर्माण जाला आहे. दरवर्षी लाल नाला ओव्हर फ्लो होऊन शेतीला तळ्याचं स्वरुप येत आहे. त्यामुळे खरीपाची पिकं पाण्यात जात आहेत. गेल्या दहा वर्षांपासून नुकसान होत असल्याने हतबल शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लाल नाला ओव्हर फ्लो यंदा विदर्भासह वर्ध्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे लाल नाला ओव्हर फ्लो झाला. या प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने रात्रीच दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाच्या खालील शेतीला तळ्याचे रूप आले आहे. मोठा खर्च करून लागवड केलेली खरीपाची पिके पाण्यात गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
40 गावांना बसतो फटका लाल नाला प्रकल्पामुळे चंद्रपूर आणि परिसरातील शेतीला फायदा झाला. मात्र, वर्ध्यातील 40 गावांच्या शेतीला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील पिकांचे नुकसान होत असून शेतीला तळ्याचे रूप येत आहे. पार्डी, हेटीसावंगी, चीजघाट, लाडकी, मानोरा, काजळसरा, नंदुरी यासह अनेक गावांना या पुराच्या पाण्याचा फटका बसतो. त्यामुळे आम्ही शेती कशी करावी आणि जगावं कसं? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. कोकणानंतर विदर्भात पावसाचा कहर, वर्ध्यात रस्त्यासह पूल गेला वाहून, घटनास्थळाचे PHOTOS शासनाकडून मदतीची मागणी हिवाळ्यामध्ये रब्बी पिकाला या लाल नाला प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही. परंतु खरीप पिकाच्या काळात या लाल नाल्यातील पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आमदार समीर कुनावार व खासदार रामदास तडस यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. लाल नाला प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असे शेतकरी राहुल भोयर यांनी बोलून दाखविले.