अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 12 जून: भारतात रोज कष्ट केल्याशिवाय चूल पेटत नाही, अशी अनेक कुटुंबं आहेत. जगण्यासाठी अनेकांचा रोजचा संघर्ष सुरू असतो. संकटांचा डोंगर अंगावर कोसळूनही काहीजण परिस्थितीशी झुंजत आपल्या संसाराचा गाडा हाकत असतात. अशीच काहीशी संघर्षाची कहाणी वर्ध्यातील दिनेश रमेशराव बुटी यांची आहे. आजारातून सावरत सांभाळलं कुटुंब दिनेश यांची घरची गरिबी, लग्न झालं आणि ऐन उमेदीत पॅरालिसिसनं गाठलं. छोटेमोठे व्यवसाय करून कसंबसं कुटुंब चालत होतं. मात्र संकटांमागून संकटं येत राहिली. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. तरीही दिनेश यांनी हार न मानता जगण्याचा संघर्ष सुरूच ठेवला. मुलांच्या शिक्षणासाठी पत्नी वैशाली आणि दिनेश यांची धडपड सुरू होती. अशा काळात मुरमुरे विकून त्यांनी मुलांना शिकवलं.
सायकलनंतर ई रिक्षा द्वारे सुरू ठेवला व्यवसाय कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी दिनेश यांनी अनेक छोटेमोठे व्यवसाय केले. या व्यवसायात सुरवातीला दिनेश यांनी सायकलवर व्यवसाय चालविला. इतर व्यवसांपेक्षा दिनेश यांना मुरमुरे विक्रीच्या व्यवसायात समाधान वाटले. त्यामुळे कालांतराने त्यांनी 2017 मध्ये याच व्यवसायाच्या बळावर सव्वा लाखांची ई रिक्षा विकत घेतली. या व्यवसायामुळे वर्धा शहरात त्यांची चांगली ओळख आहे आणि आता त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. मुलांना वेदशास्त्रचे शिक्षण दिनेश यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना वेदशास्त्राचे शिक्षण दिले. मुलेही चांगली अभ्यास करून वेदशास्त्रात कौतुकास्पद कामगिरी करत आहेत. घरची परिस्थिती हालाकिची असल्याने शंतनू बुटी आणि चिन्मय बुटी या मुलांना आपण लवकरात लवकर नोकरीवर लागावे किंवा व्यवसाय करावा आणि घरखर्चात हातभार लावावा असे वाटले. त्यामुळे दोन्ही मुलांनी वेदशास्त्राचे धडे गिरवले आहेत. तुमची मुलं मोबाईल सतत पाहतात? लगेच सवय तोडा, अन्यथा ‘या’ आजाराची होईल लागण, Video खचून न जाण्याचा संदेश दिनेश बुटी आणि त्यांच्या परिवाराने संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी केलेला संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. आता मुरमुऱ्यांसोबत अनेक खाद्यपदार्थ ते विक्री करतात. त्यातून चांगली मिळकतही होते. त्यामुळे नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही उत्तम असा सल्ला ते देतात. परिस्थिती कितीही वाईट असली तरी खचून न जाता प्रत्येकाने खंबीर राहायला हवं, हे शिकविणारी दिनेश बुटी यांची ही कहाणी आहे.