अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 29 मे: विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाच्या असणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केले आहेत. महाराष्ट्रातील अनेक अपंग आणि दृष्टीहीन होतकरू विद्यार्थ्यांनी देखील बारावीच्या परीक्षेमध्ये कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. त्याच प्रकारे वर्ध्यातील अतिशय गरीब कुटुंबातील अनुराग चिखलकर या विद्यार्थ्याने अंधत्वावर मात करत बारावीच्या परीक्षेत मोठं यश संपादित केलंय. अंधत्वावर मात करत कौतुकास्पद कामगिरी वर्धा जिल्ह्यातील दहेगाव गावंडे येथील अनुराग मनोहर चिखलकर हा जन्मत: अंध आहे. नुकत्याच झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत त्याने जिद्दीनं अंधत्वावर मात करत मोठं यश मिळवलंय. त्याला बारावीच्या परीक्षेत 67 टक्के गुण प्राप्त मिळाले. अनुरागच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याला शिक्षण घेण्यासाठी सुरवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, मात्र त्याने हार न मानता शिक्षण सुरूच ठेवले आहे.
संकटावर मात करत शिकण्याची जिद्द अनुरागचे आईवडील रोज मजुरी करतात. त्याला एक मोठा भाऊ आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे येऊन अनूरागने बारावीची परीक्षा दिली. बारावीचा अभ्यास करत असताना चांगले गुण मिळविण्यासाठी शिक्षकांचं तसेच कुटुंबीयांचं प्रोत्साहन मिळालं. तसेच ब्रेल पुस्तक आणि youtube चं मोलाचे सहकार्य लाभलं. ब्रेल बुक आणि youtube मुळे अभ्यासासाठी येणाऱ्या अनेक अडचणी दूर झाल्या, असं अनुरानं सांगितलं. दहावीच्या परीक्षेत मिळवलं होतं यश अनुरागला दहावीच्या परीक्षेतही 56 टक्के गुण प्राप्त झाले होते. आता बारावीच्या परीक्षेतही त्याने इंग्रजी, इतिहास,समाजशास्त्र, या विषयांमध्ये 70 पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. पहिल्या श्रेणीत पास होऊन 67 टक्के गुण मिळवल्यामुळे शिक्षक आणि कुटुंबीय तसेच सर्वांकडून त्याचे कौतुक होत आहे. Success Story: याला म्हणता जिद्द, जन्मत: अंध, आईचं निधन, पण सोहमने जिंकून दाखवलं, Video उच्चशिक्षित होऊन व्हायचंय शिक्षक लहानपणापासूनच अनुराग अभ्यासात हुशार आहे. त्याला अभ्यासाची, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. अनुराग आपल्या दृष्टीने सृष्टी बघू शकत नसला तरी त्याला उच्च शिक्षण घ्यायचे आहे. शिक्षक बणून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. तो आपल्या कमतरतेवर रडत बसण्याऐवजी जिद्दीनं परिस्थितीला सामोरं जातो. अनुरागची जिद्द आणि चिकाटी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.