भाग्यश्री प्रधान - आचार्य, प्रतिनिधी
ठाणे, 27 मे: जन्मतः अंध, घरची परिस्थिती अतिशय बेताची, 12 वी मध्ये प्रवेश घेता क्षणीच आईचं आजारपण आणि त्यानंतर निधन या सर्व परिस्थितीवर मात करत ठाण्यातील सोहमकुमार भट यानं मोठं यश संपादित केलंय. बारावीच्या परीक्षेत चिकाटीने अभ्यास करत त्यानं 80 टक्के गुण प्राप्त केले आहेत. सुखसोयी असताना विद्यार्थी अभ्यास करत नाहीत अशी तक्रार कायमच पालक करताना दिसून येतात. मात्र सोहमने दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून परिस्थितीवर मात केली. त्याला आय एस व्हायचे आहे. सोहमकुमार याला अभ्यास कर असे कधीच सांगावे लागले नाही असे त्याचे वडील अभिमानाने सांगतात.
रेकॉर्डिंग केलेल्या नोट्स ऐकून केला अभ्यास
बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयात सोहमने दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या सारथी कोचिंग मध्ये त्याने प्रवेश घेतला. जोशी बेडेकर महाविद्यालयात शिकत असताना आम्हाला रेकॉर्डिंग केलेल्या नोट्स अभ्यासासाठी दिल्या जात तसेच सारथी मध्येही मला रेकॉर्डिंग केलेल्या नोट्स दिल्या जात होत्या. त्या ऐकून मी अभ्यास केल्याचे सोहम सांगतो.
महाविद्यालयातील अतुल्य उपक्रमाचा लाभ
ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात सोहमकुमार शिकत आहे. महाविद्यालयाने अतुल्य या नावाने विशेष मुलांसाठी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 67 विद्यार्थी आहेत. आमच्या सारख्या मुलांना या उपक्रमअंतर्गत प्रोत्साहन दिलं जातं. इतर मुलांसारखे आम्ही देखील बरच काही करू शकतो अशी प्रेरणा या माध्यमातून आम्हाला दिली जाते. यासाठी प्राचार्य सुचित्रा नाईक, प्राध्यापक स्वप्नील मयेकर आम्हाला मार्गदर्शन करतात, असे सोहम सांगतो.
आय. एस. व्हायचंय
प्रगती अंध विद्यालयात शिकत असताना प्रांजली पाटील यांचे नाव ऐकले. या आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. मात्र त्या अंध असूनही आय एस परीक्षेत यशस्वी झाल्या. त्यांची प्रेरणा घेऊन मला ही आय एस व्हायचे आहे. यासाठी मी खूप मेहनत करेन असे सोहम सांगतो.
सोहमसारखी 6 अंध मुले 12 वी च्या परीक्षेत यशस्वी
सोहम सारख्याच आणखी सहा अंध विद्यार्थ्यांनी 12 वी च्या परीक्षेत यश मिळवले आहे. अतुल्य या उपक्रमामुळे त्यांनां हे यश मिळाले असून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम सुरू केला. सोहमच्या या यशामुळे आमच्या उपक्रमाला पोहच पावती मिळाली असल्याची भावना जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी व्यक्त केली.
वडील सुतारकाम करतात, डोक्यावर कर्ज पण रात्रशाळेत शिकत तिने मिळवला पहिला नंबर, पाहा Video
आईच्या आजारपणात रिक्षा विकली
सोहमची आई आजारी असल्यामुळे अनेक दिवस हॉस्पिटलला फेऱ्या माराव्या लागत होत्या. यावेळी अनेक दिवस रिक्षा बंद होती. रिक्षा घेताना त्यावर कर्ज घेतले होते. त्यामुळे रिक्षा बंद ठेवणे परवडणारे नव्हते म्हणून रिक्षा विकली. मात्र त्यावरच संपूर्ण घराचा खर्च सुटत असल्याने आर्थिक फटका बसला. त्यातच सोहमची आई देखील गेली. सोहमची आई गेल्यानंतर सोहमची काळजी घेण्यासाठी मला घरी बसणे भाग पडले. मात्र त्यानंतर मोठ्या मुलाने कुरिअर बॉय म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे घराला आर्थिक हातभार लागला, असे सोहमच्या वडिलांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: HSC Result, Local18, Success Story, Thane