अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 6 जून: अंगी जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर मोठ्या यशाला गवसणी घालण्यात वय सुद्धा अडथळा ठरू शकत नाही. वर्ध्यातील 8 वर्षीय चिमुकलीनं हेच दाखवून दिलं आहे. अर्णवी सागर राचर्लावार हिनं सलग 3 तास 39 मिनिटं भरतनाट्यमचं सादरीकरण करून मोठा विक्रम केलाय. चिमुकल्या अर्णवीच्या विक्रमामुळे वर्ध्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. तिच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. अवघ्या 3 वर्षांपासून सुरवात अर्णवी राचर्लावार ही चिमुकली वयाच्या अवघ्या 3 वर्षांपासून भरतनाट्यम नृत्य प्रकारचे धडे गिरवतेय. आता ती 8 वर्षांची असून उत्कृष्ट सादरीकरण करते. 5 वर्षात तिने जिल्हा, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय असे 137 परितोषिक, पुरस्कार व बक्षिसं पटकावली आहेत. आता तिनं आपल्या नृत्यानं मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय.
तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या अर्णवीचा विक्रम अर्णवी राचर्लावार ही 8 वर्षांची चिमुकली इयत्ता तिसरीत शिकतेय. नुकतेच रविवार दि. 4 जून रोजी तिने नवा विक्रम आपल्या नावे केला. सावंगी मेघे येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित इंडिया बुक ऑफ रेकार्डसाठी तिनं भरतनाट्यम नृत्य केलं. पूर्वीचा विक्रम 49 मिनिटांचा होता. तिनं 10 वाजून 39 मिनिटांनी सुरुवात केली. पहिला एक तास सलग नाट्य सादर करून यापूर्वीचा विक्रम मोडून काढला. त्यानंतर तिने स्वयंस्फुर्तीनं पुन्हा रंगमंचावर 3 तास 39 मिनिटांचा नवा विक्रम केला आहे. यावेळी इंडिया बुक ऑफ रेकार्डचे परीक्षक तत्त्वावादी यांनी अर्णवीला प्रमाणपत्र देऊन विक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर केले. जिथं पाणी मिळणं कठीण झालं तिथं विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई! गावाचं पालटलं रुप, Video अर्णवी अनेक पुरस्कारांची मानकरी यापूर्वी 2020 मध्ये रशिया आणि दुबई येथे नृत्य स्पर्धेसाठी अर्णवीची निवड झाली होती. मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड, लॅम्बडा लिट्ररी अवार्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराची मानकरीही ती ठरली आहे. अर्णवीनं लघुपट व अल्बममध्येही बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. कोरोना काळात तिने घरीच भरतनाट्याचा सराव सुरू केला. गेल्या काही महिन्यांपासून ती दररोज 1 तास सराव करीत होती. तिची मेहनत फळाला आली असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर अर्णवी इतरही रेकॉर्ड्स तोडेल आणि वर्धा जिल्ह्याचे नाव सातासमुद्रा पार नेईल हीच सदिच्छा.