स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 5 जून: उन्हानं शरीराची लाहीलाही होत असातना हिरवळीनं नटलेला परिसर सर्वांनाच आवडतो. पण सांगली जिल्ह्यातील जत सारख्या दुष्काळी भागात हिरवळ शोधूनही सापडत नाही. मात्र, जिल्हा परिषद शाळेतील बालचमुंच्या ग्रीन आर्मीनं एका गावाचं रुपडंच पालटून टाकलंय. कुलाळवाडीतील विद्यार्थ्यांनी शाळा, घराचा परिसर, शेताच्या बांधावर 4 हजारांहून अधिक झाडे लावली आणि ती जगवलीही आहेत. शाळेच्या वनराई वृक्ष संवर्धन उपक्रमामुळं संपूर्ण गावानंच वृक्ष संगोपन कार्यात स्वत:ला वाहून घेतलंय. कुलाळवाडी हे कायम दुष्काळी गाव जत तालुक्यातील कुलाळवाडी हे कायम दुष्काळी गाव आहे. या गावात पर्जन्यमान कमी असल्याने याठिकाणी पिके सोडा कुसळे देखील उगविणे शक्य नव्हते. दुष्काळी भाग असल्याने येथील ग्रामस्थ ऊस तोडणीची कामे करतात. मात्र, कुलाळवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेनं संपूर्ण गावाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. हे गाव माझी भाकरी या उपक्रमामुळे प्रकाश झोतात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना भाकरी कशी करायची याचे धडे या शाळेतील शिक्षकांनी दिले. या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक झाले.
राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धन उपक्रम या जिल्हा परिषदेच्या शाळेत आणखी एक उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. शिक्षक, ग्रामस्थ व वृक्षप्रेमींच्या सहकार्याने राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धन उपक्रम राबविला आहे. यातून पर्यावरण रक्षण व भावी पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगणे, असा दुहेरी हेतू साध्य झाला आहे. शाळा परिसर, गावठाण, खंडोबा व बिरोबा देवस्थानच्या सुमारे दहा एकर परिसरावर, घरांच्या सभोवताली, शेतांच्या बांधावर 4 हजारांहून अधिक झाडांचे जतन व संवर्धन केले आहे. दरवर्षी एक लाखांहून अधिक बियांचे संकलन विद्यार्थी दर वर्षी सुमारे एक लाखाहून अधिक बियांचे संकलन करतात. याद्वारे रोपवाटिका तयार केली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने व श्रमदानातून सुमारे दोन हजार फूट पीव्हीसी व पाच हजार फुटाहून अधिक भूमिगत ठिबक सिंचन पाइपलाइन केली आहे. पालापाचोळा गोळा करून त्याचे मल्चिंग केले आहे. झाडांभोवती तारेचे कुंपण उभारले आहे. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहेत ऐतिहासिक 55 विहिरी, कुठे? पाहा हा VIDEO उन्हाळ्यात विद्यार्थ्यांची ग्रीन आर्मी कार्यरत यंदाच्या वर्षी उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला. त्यामुळे माणसांना सावली देणारे मोठमोठे वृक्ष वाळून जात होते. कुलाळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेला उन्हाळी सुट्टी असल्याने विद्यार्थी शाळेत येणे बंद झाले. मात्र, पर्यावरणाचा ध्यास घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रीन आर्मीनं कडक उन्हाळ्यातही वनराई टिकविण्यासाठी धडपड केली. शाळेला सुट्टी असली तरी प्रत्येक विद्यार्थी वनराईच्या ठिकाणी येऊन झाडांना पाणी घालणे, मल्चिंग करणे, खत टाकणे इत्यादी कामे करत आहे. त्याचाच परिणाम म्हणून तळपत्या उन्हातही गारवा देणारी वृक्ष संपदा फुलली आहे. वृक्ष संवर्धनास अनेकांचे मदतीचे हात कुलाळवाडीतील वृक्ष संवर्धन उपक्रम शाळेतील शिक्षकांच्या पुढाकारानं सुरू झाला. त्याला विद्यार्थी, ग्रामस्थांनी साथ दिली. तसेच या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी अमेरिकेतून सचिन मिरजकर, अभिजित मिरजकर, प्रमोद मंद्रे, सचिन ढमढेरे, संतोष महाजन, आशिष गोर, देवेंद्र सायखेडकर, युथ फॉर जत संस्थेचे अजय पवार (इंग्लंड), प्रमोद मांडरे, आशिष गोर, जोशिल अविक्कल, सिद्धार्थ कुंडलकर, सईद इरफान पाशा, अतुल टेंबे, ऑस्ट्रेलियातून हिमांशू ठाकूर, संजय वाखरे यांनी मदत केली.