वर्धा, 14 नोव्हेंबर : मुलं ही देवाघरची फुले अस मानलं जाते. मुलांच्या सुगंध आयुष्यभर दरवळावा, यासाठी लहानपणापासूनच योग्य संगोपन होणे गरजेचे आहे. परंतु, सर्वांच्याच जीवनवाटा सुखकर नसतात. कुणी रस्त्याच्या कडेला भिक्षा मागून जगणाऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला, कुणी दारू काढणाऱ्याच्या परिवारात जन्म घेतला, तर कुणाला जन्म दिल्याबरोबरच जन्मदात्यांनीच सोडून दिलं. अशा या बालकांच्या आयुष्याचं काय? अशा अनाथ, गरीब आणि परिस्थितीचा चटका बसलेल्या मुलांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी वर्ध्या तील दोन माऊली अहोरात्र धडपडत आहेत. वर्ध्यातील बालकांना नवे आयुष्य देणाऱ्या या माऊली म्हणजे ‘आसमंत स्नेहालय’ सेवाश्रमाच्या माधवी शिवाजी चौधरी आणि ‘उमेद संकल्प’ प्रकल्पाच्या मंगेशी मून होय. या दोन्ही माऊलींनी आपल्या सुखी जीवनाची पर्वा न करता पदोपदी मिळालेली ‘देवाघरची फुले’ वेचून त्यांचे आयुष्य सुगंधित करण्यासाठी गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात यश आले असून त्यांच्या आश्रमातील मुले- मुली शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांसह जीवनाचीही यशस्वी वाटचाल करीत असल्याने हेच खरे बालदिनाचे साध्य आहे. केशव सिटीतील ‘आसमंत स्नेहालय’ सेवाश्रम शहरालगतच्या केशव सिटी, सिदी (मेघे) परिसरातील आसंमत स्नेहालय सेवाश्रमाची स्थापना 2015 मध्ये शिवाजी व माधवी चौधरी या दाम्पत्याने केली. सुरुवातीला एका अनाथ मुलाचे पालकत्व स्वीकारून या कार्याला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या या आश्रमात मुला-मुलींची संख्या वाढत गेली. सध्या येथे 45 मुलेमुली आश्रयाला असून, त्यांच्या शिक्षणासह सर्वच खर्च हे दाम्पत्य करीत आहे. या सेवाभावाकरिता माधवी यांनी शासकीय नोकरी त्यागून या कामात वाहून घेतले. या ठिकाणी पहिल्या वर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे मुलेमुली असून त्यांना शिक्षण, संस्कार आणि संघर्षाचीही शिकवण दिली जात आहे. लोकसहभाग आणि भजन, गायनाचे कार्यक्रम करून आबालवृद्धांचा सांभाळ चौधरी दाम्पत्य करीत आहे. Children Day : 5 ॲप्स आणि 3 वेबसाईट बनवणारी नाशिकची अँड्रॉईड गर्ल, पाहा Video
रोठा शिवारातील ‘उमेद संकल्प’ प्रकल्प
शहरालगतच्या रोठा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उमेद संकल्प प्रकल्पाची सुरुवात 2016 मध्ये मंगेशी मून यांनी स्वतःच्याच शेतामध्ये केली. पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू झाली. आई-वडिलांसोबत दारूच्या भट्ट्या काढण्यात किंवा भिक्षा मागण्यात गुंतलेले हात त्यांनी बाराखडी गिरविण्याकडे वळविले. बघता-बघता त्यांच्या या प्रकल्पामध्ये 70 विद्यार्थ्यांना नवे आयुष्य मिळाले. यात अंगणवाडीपासून ते दहावीपर्यंतची मुलेमुली आहेत. इतकेच नाही तर दहावी उत्तीर्ण झालेलेही पाच ते सहा विद्यार्थी पुढील शिक्षणाकरिता मोठ्या शहरात गेले असून, त्यांचेही संगोपन या प्रकल्पाच्याच माध्यमातून सुरू आहे. लोकसहभाग आणि शेतीतील उत्पन्नातून येथील सर्व खर्च भागविला जात आहे.