वर्धा, 14 ऑक्टोबर : प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीमध्ये फराळ साहित्य बनवले जाते. यासाठी खाद्य तेलाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. दिवाळीत तेलाची मागणी वाढते. मात्र, वाढल्या मागणीमुळे तेलात भेसळीची शक्यता नाकारता येत नाही. सरकारनेही सुटे तेल विक्रीवर बंदी घातली आहे. त्यानुसार वर्धा जिल्हा अन्न व औषधी प्रशासन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत सात तेल विक्रेत्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. होलसेल व्यापाऱ्यांना सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार होलसेल विक्रेत्यांना पॅकिंग न फोडता तेलाची विक्री करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. केंद्र सरकारच्या या आदेशामुळे व्यापारी व होलसेल विक्रेत्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी वारंवार मुदतवाढ दिलेली आहे. मात्र, अन्न व औषधी प्रशासनाकडून जिल्ह्यात भेसळीबाबत तपास मोहीम राबविली जात आहे. फिरत्या चाकावरती मातीला आकार, दिवाळीसाठी घ्या आकर्षक पणत्या! पाहा Video पुरवठादारांकडूनही सुट्या तेलाची विक्री केली जाते. त्यामुळे तेलामध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढते. आता सुट्या तेलाच्या विक्रीवर बंद असल्याने भेसळीला आळा बसणार असल्याचे तेल विक्रेता श्रीनिवास मोहता यांनी सांगितले. दिवाळीनिमित्त विशेष दक्षता सध्या सणासुदीच्या दिवसांमध्ये तेलाची मागणी वाढत असल्याने खुल्या तेलाची विक्री होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच तपासणी सुरू केली असून, आतापर्यंत खुल्या तेलाची विक्री करणाऱ्या सात विक्रेत्यांवर कारवाईही केली आहे. दिवाळीच्या दिवसांत विशेष दक्षता घेतली जात असून, तपासणी सुरूच राहणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी, किरण गेडाम यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.