तुषार कोहळे, नागपूर, 11 मार्च: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. नागपूरकरांना पुन्हा एकदा लॉकडाऊनचा (Coronavirus Lockdown in Nagpur) सामना करावा लागणार आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता (COVID-19 Cases in Nagpur) प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 ते 21 मार्च 2021 दरम्यान नागपुरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी याबाबत घोषणा केली. त्यांनी यावेळी नागरिकांना कारणाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असून, नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लागू केले जाणार आहे. नागपूर महानगरपालिका हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, याठिकाणी देखील लॉकडाऊन असणार आहे.
(हे वाचा-Corona Vaccine: 'आधी देशाची गरज पूर्ण करा मग बाहेर पाठवा')
या काळात उद्योग सुरू राहतील, सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील ( भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया ) अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. या कालावधी दरम्यान सर्व खाजगी कार्यालय बंद राहतील तर सरकारी कार्यालयं 25 टक्के उपस्थितीत सुरू राहणार आहेत. शिवाय दारू दुकाने बंद राहतील मात्र दारूची ऑनलाइन घरपोच सेवा सुरू राहणार आहे.
नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार या काळात फ्रंटलाइन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण (Coronavirus Vaccination) सुरू राहणार आहे. लसीकरणसाठी जाणाऱ्यांना नोंदणीचा कागद घेऊन केंद्रावर जाणे अनिवार्य असणार आहे.
(हे वाचा-आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागतोय का Vaccine Passport? काय आहे प्रकार, जाणून घ्या)
यावेळी नितीन राऊत म्हणाले की, 'एक वर्षांपूर्वी आजच नागपूरात कोरोना चा पहिला रुग्णाला आढळला होता. तेव्हा पासून आजवर 1 लाख 62 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4 हजार 215 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्ये स्थिती नियंत्रणात होती मात्र आता पुन्हा रुग्ण वाढत आहेत. आज आम्ही प्रशासनासोबत बैठक घेतली. नागपूर शहरात रुग्णांची संख्या मोठी आढळत आहे. शिवाय काही ग्रामीण भागात ही रुग्ण आढळत आहे'.
ते पुढे असं म्हणाले की, 'काही ठिकाणी बाधित रुग्ण बाहेर फिरत आहेत. काही ठिकाणी आयसोलेशनच्या नियमांचा उल्लंघन केलं जात आहे. त्यामुळे संक्रमण वाढत आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.