अमरावती, 07 जुलै : अमरावती जिल्ह्यातील (amaravati) अनेक तालुक्यात जोरदार पावसाने दैना उडाली आहे. (vidarbha rain update) मोर्शी, तिवसा, धामणगाव रेल्वे तालुक्यात अतिवृष्टीसह वरूड, चांदूर बाजार, धारणी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने अनेक गावे जलमय झाली. (heavy rain fall in vidarbha) त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
तिवसा तालुक्यातील काही भागात सोमवारी आणि मंगळावारी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे नदी-नाले तुडूंब झाल्याने अनेक गावात पाणी शिरले. जीवनावश्यक वस्तू धान्य वाया गेले असल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केल्याने नागरिकांना तुर्त दिलासा मिळाला आहे. तसेच एका बाळंत महिलेला नाल्यातील पुराचे पाणी शिरलेल्या घरात रात्र काढावी लागली. याचबरोबर गुरुदेवनगर जिल्हा परिषद शाळेजवळील घरात पाणी शिरल्याने तारांबळ उडाली होती.
हे ही वाचा : Konkan Rain Update : धोका! समुद्र खवळणार, कोकणातील 60 गावांना सतर्कतेचा इशारा
कुर्हा येथे शेती पाण्याखाली गेली, जनावरे वाहून गेली
मुसळधार पावसाने कुर्हावासी तसेच शेतकऱ्यांचे संकट वाढले. जोरदार पावसाने तसेच ढगफुटी झाल्याने कुर्हा परिसरातील वडळी, मार्डा, छिंदवाडी, कौंडण्यपूर, मिर्जापूर, आखतवाडा, भारसवाडी, वरखेड क्षेत्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरात काही जनावरे तसेच शेड देखील वाहून गेले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अधिकाऱ्यांनी पाहणी करीत पंचनामे न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
चांदूर बाजार तालुक्यात पावसाचा कहर
मंगळवारी (5 जून) सकाळी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे चांदूर बाजार व ग्रामीण भागात नदी नाल्यांना पूर आले. या नदी नाल्याच्या काठावर असलेल्या अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आले होते. तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाचे सकाळी 10 वाजता नऊ ही दरवाजे उघडले आहेत. नाल्या काठावर असलेले धर्मारपुरा, राम भट प्लाट, माळीपुरा या वस्तीत नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. चांदूर बाजार परतवाडा रस्त्यावर नाल्या वरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. नुकताच तो पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. त्या बांधकामातील काही भाग खचल्याने पुराचे पाणी वस्तीत शिरले. कित्येक घरातील जीवनावश्यक वस्तूंचे तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले.
हे ही वाचा : Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढला, पुढील काही तास महत्त्वाचे
चांदूर बाजार तालुक्यात चांदूर बाजार (80mm), बेलोरा (97mm), ब्राह्मणवाडी थंडी (87.50mm) या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. तालुक्यातील 390 पेक्षाही जास्त नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामध्ये बेलोरा, वाठोडा, ब्राह्मणवाडा थडी, कुरळपूर्णा, दहीगाव या भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. शहरात तहसीलदार धीरज स्थूल, नप मुख्याधिकारी आशिष घोडे, ठाणेदार सुनील निगे यांनी पाहणी केली. तहसीलदार धीरज स्थूल यांनी चांदूर बाजार शहरासाठी 7 व ग्रामीण भागासाठी प्रत्येक गावात एक पथक निर्माण करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
ढगफुटीने शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान
मंगळवारी पहाटे 3 वाजेपासून सुरु झालेल्या जोरदार पावसाने परिसरात कहर केला. मोर्शी तालुक्यात 70 टक्के पेरणी झाली होती. ढगफुटी झाल्याने शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट आले आहे. मोर्शी उपविभागीय अधिकारी नितिनकुमार हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे यांनी सकाळी नुकसान ग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. संबंधित तलाठ्यांना नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. रिद्धपूर मंडळ तलाठी राजेश संतापे यांना नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतात पाणी असल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Monsoon, Vidarbha, अमरावतीamravati