मुंबई, 7 जुलै : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आज (गुरूवार) सकाळी देखील कायम आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडतोय. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये येत्या 3 ते 4 तास जोरदार पाऊस (Mumbai Rain Update) पडेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आज पहाटे साडेपाच पर्यंत कुलाबा वेधशाळेत 95.4 मिमी तर सांताक्रुझमध्ये 96.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई-ठाण्यासह जवळच्या रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागात तीव्र ते अती तीव्र पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्याचप्रमाणे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस आगामी काही तासांंमध्ये पडेल, असे हवामान विभागानं स्पष्ट केलं. नागरिकांना बाहेर पडण्यापूर्वी खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही हवामान विभागानं दिली आहे. येत्या 4, 5 दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. लोकं नको म्हणत असताना दुचाकी चालकाचं भलतं धाडस! पुरातील धक्कादायक Video व्हायरल मुख्यमंत्री सक्रीय राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना (NDRF) तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.