लग्नास नकार दिला म्हणून भाच्यानं मामाचीच मुलगी पळवली, वाचा पुढे काय झालं ते...

लग्नास नकार दिला म्हणून भाच्यानं मामाचीच मुलगी पळवली, वाचा पुढे काय झालं ते...

  • Share this:

पंढरपूर, 10 जून: सख्ख्या मामाच्या अल्पवयीन मुलीनं लग्नाला नकार दिल्यामुळे तिचं अपहरण करून तिला ऊसाच्या फडात लपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्यादीवरून कुर्डूवाडी पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतलं आहे. एक आरोपी फरार आहे. ही घटना लव्हे, (ता. माढा) येथे घडली आहे.

हेही वाचा.. पालघर साधू हत्याकांड: CID चौकशीनंतर जंगलात गेलेला तरुण घरी परतलाच नाही

नेमकं काय आहे प्रकरण?

कुर्डूवाडी पोलिसांत तानाजी मधुकर शेंबडे, अभिजित मधुकर शेंबडे दोघे बंधू (रा. माळशिरस) व त्यांना मदत करणारे त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्‍वर पांडुरंग गोफणे (रा. महादेववाडी), विकास चोपडे (रा.कव्हे, ता. माढा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी शेंबडे यांचे मामा लव्हे येथे राहतात. तानाजीने मामाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाची अनेक वेळा मागणी घालूनही मामाने लग्नाला नकार दिला होता. मुलीचाही या लग्‍नास विरोध होता.

दरम्यान, मुलीच्या लग्नासाठी माढा तालुक्यातील एका गावामध्ये स्थळ पाहण्यासाठी पीडित मुलीचे वडील गेल्याची कुणकुण माळशिरस येथील भाच्याला लागली होती. त्यामुळे मुलीचे घरातून अपहरण करुन लग्न करण्याची योजना त्याने आखली. तानाजी शेंबडे व त्याचा भाऊ अभिजित कुर्डूवाडी येथे आले. मुलीचे अपहरण करण्यासाठी या दोघांनी माढा तालुक्यातील महादेववाडी येथील त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्‍वर गोफणे यास चारचाकी गाडी भाड्याने आणण्यास सांगितले. त्यानुसार ज्ञानेश्‍वर यांनी कव्हे येथील विकास चोपडे यांची चारचाकी गाडी आणली. यातून चौघे लव्हे येथील मामाच्या वस्तीवर गेले. घरी पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ दोघेच होते.

तानाजीने आल्याबरोबर मामाच्या लहान मुलाला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर आणायला सांगितले. मुलगा आतल्या खोलीत चार्जर आणण्यासाठी गेला, तेव्हा बाहेरून कडी लावून दरवाजा बंद केला. तानाजी व अभिजित यांनी मामाच्या मुलीला गाडीत बसण्यास सांगितले, परंतु मुलीने गाडीत बसण्यास नकार दिला. त्यानंतर या दोघांनी पीडित मुलीला ओढत आणून गाडीत बसवले.

आरडाओरडा ऐकून शेजारी शेतात काम करणारा एक व्यक्‍ती तिथे आला. त्यालाही ढकलून देऊन खाली पाडले व गाडीत बसून ते निघून गेले. आरोपीच्या नावानिशी पोलिसांत फिर्याद दाखल होताच पोलिसांचे एक पथक माळशिरस येथे गेले. परंतु याबाबत मुलाच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कुर्डूवाडी पोलिसांत साक्ष देण्याची सूचना करून हे पथक टेंभुर्णी येथे आले.

तक्रारदाराच्या सूचनेनुसार बेंबळे येथे तानाजीच्या नातेवाईकाकडे गेले. तेथेही मुलीचा शोध लागला नाही. अपहरणकर्त्यांनी मुलीला ऊसाच्या फडात मध्यभागी नेऊन ठेवले होते. पोलिस ऊसामध्ये मुलीचा शोध घेण्यासाठीही गेले. परंतु पोलिसांना पाहताच अपहरणकर्त्यांनी मुलीचे तोंड दाबून ऊसामध्ये दडवून ठेवले होते.

हेही वाचा..लॉकडाऊनमध्ये फिरण्यासाठी वडिलांनी दिली नाही बाईक, मुलानं उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या धमकीनंतर बेंबळे येथील नातेवाईकांनी तानाजीला त्या पळवून आणलेल्या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार तानाजी पहाटेच त्या मुलीला घेऊन माळशिरस या आपल्या गावी गेला. माळशिरस येथून याबाबतची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी पीडित मुलीसह अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना मदत करणारा गाडीचालक विकास चोपडे अद्याप फरार आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: June 10, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading