रत्नागिरी, 7 फेब्रुवारी : उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनंतर आता पदाधिकारीही अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी येथील एका बंद पडलेल्या कंपनीतील कोट्यवधी रुपयांचे भंगार चोरी गेले आहे. या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या शिवसेना ठाकरे गटातील पुढाऱ्यांवर आता अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती पुढे आली आहे.
काय आहे प्रकरण?
ठाकरे गटाचे खेड तालुकाप्रमुख व लोटे गावचे सरपंच चंद्रकांत चाळके, माजी पंचायत समिती सभापती जीवन आंब्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे व अंकुश काते या चौघा संशयिताच्या विरोधात भंगार चोरी प्रकरणात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. या चौघांनी खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने या चारही पुढाऱ्यांना पोलिसांकडून आता अटक केली जाण्याची शक्यता आहे. सध्या खेड पोलीस या चारही संशयित आरोपी असलेल्या पुढाऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.
वाचा - काँग्रेसमधला 'मॅटर' अजितदादांकडून कन्फर्म, पण नाना पटोलेंना कल्पनाच नाही!
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यामुळे प्रकरण उजेडात
लोटे एमआयडीसी येथील बंद पडलेल्या मिसाळ कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या भंगाराची चोरी झाल्याचा प्रकार साधारण दोन महिन्यांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत उघडकीस आणला होता. या प्रकरणात एका स्थानिक युवक वैभव आंब्रे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांच्या तपासात ठाकरे गटातील चार पुढाऱ्यांना या प्रकरणात संशयित आरोपी करण्यात आले आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी हा प्रकार उघड केल्याने याला राजकीय रंग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratnagiri, Uddhav tahckeray