पुणे, 7 जानेवारी : सत्यजीत तांबे यांच्यावरून महाराष्ट्र काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा पाठवला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं यामध्ये त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य झाल्याचं स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. बाळासाहेब थोरात यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, तेव्हा बाहेर येत असलेल्या बातम्यांबाबत विचारलं, तेव्हा त्यांनी आपण विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला असल्याचं सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी थोरातांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केलं असलं तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाच या राजीनाम्याबाबत काही माहिती नसल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात माझ्या संपर्कात नाहीत, त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. त्यांनी राजीनामा दिला का नाही, याबद्दल मी सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. दरम्यान या वादावर तोडगा काढण्यासाठी नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने दिल्लीला बोलावलं आहे, त्यामुळे नाना पटोले उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. तांबेंवरून नानांचा दादांवर निशाणा याआधी सत्यजीत तांबे प्रकरणावरून नाना पटोले यांनी अजित पवारांवरच निशाणा साधला होता. तांबे-थोरात कुटुंबातला वाद अजितदादांनी चव्हाट्यावर आणल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. सत्यजीत तांबे काँग्रेस सोडून जाणार नाही, तो काँग्रेसचा सहयोगी आमदार असेल, कारण त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर याबाबतचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. हे सांगत असतानाच नाना पटोले यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ‘अजित पवारांनी आमच्यावर टीका केली. आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर टीका केली. ते महाविकासआघाडीमध्ये आहे, तरीही सांगतात या उमेदवाराला आम्ही मतं दिली. तांबेंच्या घरातलं भांडण होतं, त्याला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवार करत आहेत. मी बाळासाहेब थोरातांना सांगितलं, नाना पटोलेंना सांगितलं, असं ते म्हणतात. उद्धव ठाकरेंचं सरकार पडत होतं, मी सांगितलं होतं, असंही अजित पवार म्हणतात. तुम्हाहा माहिती होतं, तुमच्याकडेच गृहखातं होतं,’ असा घणाघात नाना पटोले यांनी अजित पवारांवर केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.