मुंबई, 05 ऑगस्ट : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे हे पुन्हा बसले आहेत. यापूर्वी पत्नी रश्मी ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री होते त्यामुळे सामनाच्या संपादकपद पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे दिले होते. याआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ‘सामना’चे संपादक होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते.
दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर शिवसेनेत हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. दरम्यान ते आता कोणत्याही संविधानीक पदावर नसल्याने पुन्हा सामनाच्या संपादक पदाची धुरा सांभाळणार आहेत.
हे ही वाचा : खासदार महाडिकांना खासगीत गोकुळ आणि केडीसीसी कारभाराबद्दल सांगेन : हसन मुश्रीफ
संपादक हे पद लाभाचं पद असल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री काळात ठेवण्यात अडचणी होत्या. त्यामुळे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी ही रश्मी ठाकरेंकडे सोपवण्यात आली होती.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका मांडत होते. ‘सामना’ म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ‘सामना’ असंच समीकरण गेली अनेक वर्षे पाहायला मिळाले. देशातील महत्वाच्या मुद्द्यावर सामनाच्या अग्रलेखातून कोणती ‘रोखठोक’ भूमिका मांडली आहे, याकडे देशभरातील माध्यमांचं लक्ष लागलेले असते.
हे ही वाचा : सेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत पहिलं यश; सोलापूरमधून ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी
भाजपसोबत सत्तेत असतानाही भाजपवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे टीकेची झोड उठवत होते. देशभरातील माध्यमांचे लक्ष असणाऱ्या या वृत्तपत्राचे संपादकपद आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आहे. उद्धव ठाकरे अग्रलेखातून कोणती आणि कशा प्रकारे भूमिका मांडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याकडे सगळ्या भारताचे लक्ष लागून राहिले आहे.