नरेंद्र मते, (प्रतिनिधी) वर्धा, 5 जुलै: निसर्गरम्य तलाव परिसरात आलेल्या मित्रांना सेल्फी काढायचा मोह जीवावर बेतला. तलावाच्या काठावर उभे राहून सेल्फी घेत असताना पाचही जण पाण्यात पडले. त्यापैकी दोघांना जलसमाधी मिळाली तर तिघे थोडक्यात बचावले. कारंजा तालुक्यातील उमरी येथील पाच जण धावसा (हेटी) येथील तलाव परिसरात ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. तेजस राजू चोपडे (वय 15) आणि हर्षल संजय चौधरी, (दोघेही रा. उमरी) अशी मृतांची नावे आहेत. हेही वाचा… कोरोनाचा नवा हॉटस्पॉट! एका पॉझिटिव्हमुळे 27 जणांना जडला संसर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्गरम्य परिसरात सेल्फी काढण्यासाठी खास उमरी येथून हे मित्र धावसा (हेटी) येथील तलावावर आले होते. काही काळ सगळे तलावा परिसरात फिरले. त्यांनी फोटोसेशनही केलं. परंतु सेल्फी काढताना संपूर्ण तलाव मागे दिसावा असा काहींचा आग्रह होता. सेल्फीच्या नादात तलावात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीच्या बाजूला खोल खड्डयाजवळ सेल्फी काढत असताना एकाचा पाय घसरला. यावेळी उपस्थित चौघांनी एकमेकांचे हात धरून साखळी करून वाचवायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पाचही तलावात पडले. धावसा (हेटी) येथील एक मित्र हर्षल धनराज कालभूत बाहेर काही अंतरावर उभा होता. हा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्यानं मोठी हिंमत दाखवत एक-एक करीत तिघांना बाहेर काढले. मात्र, दोघांना वाचवण्यात त्याला यश आलं नाही. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी घटना घडल्याने दोन्ही गावात शोककळा पसरली. ही घटना घडताच पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. सहायक पोलिस निरीक्षक बबन मोहडुळे, नीतेश वैद्य, गुड्डू थूल, निखिल फुटाणे घटनास्थळी पोहोचले. तलावात चार जणांकडून शोधकार्य करण्यात आले. हेही वाचा… संत तुकारामांचं देहू हादरलं, चारित्र्याच्या संशयावरून पतीनं केली पत्नीची हत्या दरम्यान, पाऊस बरसायला लागला आहे. सद्या परिसरातील नदी, नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तलावांची पाणीपातळीही वाढली. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केल्याने अनेकांची पावले आपसुकच तलाव, ओढे, नदीकिनाऱ्याकडे वळतात. त्यात तरुणांचे प्रमाण अधिक असते. सोशल मीडियाच्या आजच्या युगात निसर्गरम्य ठिकाणी सेल्फी घेण्याची जणू क्रेझच आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसांत अशा ठिकाणी नक्की जा, परंतु संभावित धोके लक्षात घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे. तलाव परिसरात फिरायला गेलेल्या तरुणांनाही सेल्फीचा भारी नाद आहे. मात्र, अतिउत्साह जीवावर बेतू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







