ठाणे, 14 ऑक्टोबर : राज्यात सर्वदूर धुमाकूळ घालत असणाऱ्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबई, पुणे, ठाणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरात मुसळधार पाऊस कोसळला. पुण्यातील परतीच्या पावसाचे भयानक दृश्य आज संध्याकाळी समोर आले होते. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याचे देखील वृत्त समोर आले आहे. पावसाचा हा धुमाकूळ सुरु असतानाच भिवंडीत आज अतिशय अनपेक्षित आणि वाईट घटना घडली आहे. भिवंडीत चार जणांवर वीज कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. संबंधित घटना ही भिवंडी तालुक्यात पिसे ग्रामपंचायत हद्दीतील चिराडपाडा या आदिवासी वस्तीत घडली. या दुर्घटनेत दोन तरुणींचा जागीच मृत्य झाला. भिवंडी परिसरात सायंकाळपासून विजेच्या कडकडाटात सुरु असलेल्या परतीच्या पावसात तालुक्यातील फुलोरे पाडा इथं खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चौघांवर वीज पडली. या दुर्घटनेत एका तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एका मुलासह महिला जखमी झाली आहे. शितल अंकुश वाघे (वय 17) आणि बबींता दिनेश वाघे (वय 28) असे मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. मयत झालेल्या शितल हिची आई सुगंधा अंकुश वाघे ही जखमी झाली आहे. तर रोशन नावाचा एक मुलगा जखमी झाल्याने त्याच्यावर पडघा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सूरू आहेत. ( पुण्याची मुंबई होतेय? तुफान पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरुप, FC रोडवरील Video पाहिला का? ) चिराडपाडा या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या शीतल अंकुश वाघे, योगिता दिनेश वाघे आणि सुगंधा अंकुश वाघे या सायंकाळी पाऊस नसल्याने जंगलात भाजीसाठी खेकडे पकडण्यासाठी गेले होते. या दरम्यान अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पाहतापाहता या पावसाने रौद्र रुप धारण केलं आणि अचानक वीज जमिनीवर कोसळली. या दुर्घटनेत या तिघींवर वीज कोसळली. त्यामुळे दोघींचा जागीच मृत्यू झाला. वीज कोसळल्यानंतर तासभर मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर पाड्यावरील नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी या तिघींना पडघा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी घेऊन गेले. तिथे दोघी जणींना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. तर एका जखमी महिलेला पुढील उपचारासाठी भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.