मॉर्निग वॉक करणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला चिरडलं, मद्यधुंद अवस्थेत होता ट्रॅक्टर चालक

मॉर्निग वॉक करणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला चिरडलं, मद्यधुंद अवस्थेत होता ट्रॅक्टर चालक

मद्यधुंद ट्रॅक्टर चालकानं मॉर्निग वॉक करणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे

  • Share this:

पंढरपूर, 24 डिसेंबर: मद्यधुंद ट्रॅक्टर चालकानं मॉर्निग वॉक करणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

तुकाराम आत्माराम नागणे (वय-75, रा. उपरी ) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेमुळे उपरी गावावर शोककळा पसरली आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने जातात. ट्रॅक्टर चालक हे मद्यसेवन करून वाहन चालवतात, अशातच एका निष्पाप ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी गावाजवळच्या नागणेवाडी परिसरात हा अपघात घडला. उपरी येथील रहिवासी तुकाराम नागणे हे आज सकाळी घरापासून जवळच असलेल्या महामार्गालगत फेरफटका मारत होते. तितक्यात त्यांनी मागून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरनं जोरदार धडक दिली. यात तुकाराम नागणे यांचा जागेवरच मृत्यू झाला.

(हे वाचा-बीडमध्ये 'या' लोकनेत्याच्या कारखान्याबाहेर शेतकरी आक्रमक, गाळप बंदची दिली हाक)

अपघातानंतर चालकाने ट्रॅक्टरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जवळच्या असलेल्या तरूणांनी मोटारसायकलनं त्याचा पाठलाग करून दोन किलीमीटर अंतरावर ट्रॅक्टर थांबवला. त्यावेळी ट्रॅक्टर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं दिसून आलं. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

मृत व्यक्ती पंढरपूर येथील पूजा ज्वेलर्सचे मालक सुभाष नागणे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

(हे वाचा-भरधाव बसनं सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला चिरडलं, तरुण जागेवरच ठार)

दरम्यान, मागील आठवड्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या पती-पत्नीला वाळू माफियांच्या वाहनानं जोरदार धडक दिली होती. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला होता. पती गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 24, 2020, 10:15 AM IST

ताज्या बातम्या