मुंबई, 22 मार्च : आज गुढीपाडवा आहे. राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय. आज मनसेचा पाडवा मेळावा देखील आहे. या निमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भव्य अशी सभा होणार आहे. मनसेचा पाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असून, या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मनसेच्या वतीनं या मेळाव्याचे दोन टीझर जारी करण्यात आले आहेत. या टीझरमुळे मेळाव्याची उत्सुकता वाढली आहे. राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे काय बोलणार?
राज ठाकरे यांच्या पाडव्या मेळाव्याचे दोन टीझर जारी करण्यात आले आहेत. या टीझरमुळे मेळाव्याची उत्सुकता वाढली असून, राज ठाकरे यांच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मनसेच्या पहिल्या टीझरमध्ये मराठी भाषा तसेच हिंदू धर्म यावर भर देण्यात आला आहे. तर दुसऱ्या टीझरमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करण्यात आला आहे. हीच बाळासाहेबांची देखील इच्छा होती, राज ठाकरे यांच्या यशस्वी आंदोलनामुळे बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली असं या टीझरमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये पुन्हा एकदा हे दोन मुद्दे केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.
मनसेची बॅनरबाजी
राज ठाकरे यांच्या मेळाव्यापूर्वी शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनर उभारण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा अशय असलेला मजकुर छापण्यात आला आहे. विशेष म्हणजे मनसेकडून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. राज ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभेपूर्वी हे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेढून घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gudi Padwa 2023, MNS, Raj Thackeray