सातारा, 18 डिसेंबर: कराड तालुक्यातील सैदापूर गावावर शोककळा पसरली आहे. गावातील तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचं बोललं जात आहे.
आस्था शिवानंद सासवे (वय-9), आरुषी शिवानंद सासवे (वय-8) आणि आयुषी शिवानंद सासवे (वय-3) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा...माझ्या दोन मुलांना तुमच्या मुलांप्रमाणे सांभाळा, असं म्हणत शेतकऱ्यानं संपवलं
मिळालेली माहिती अशी की, सासवे कुटुंबानं गुरुवारी रात्री एकत्रित जेवण केलं. त्यानंतर आईसह या आयुषी, आस्था आणि आरुषी या तिन्ही बहिणींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. यानंतर तीन मुलींची प्रकृती खालावल्यानं त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू झाला. मुलींच्या आईची प्रकृती आता स्थीर आहे. या घटनेनंतर सासवे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी दिलेली माहिती अशी की, तिन्ही मुलांना अन्नातून विषबाधा झाली असावी, त्यातूनच तिघींचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे.
हेही वाचा...मृत्यूचा सापळा! 100 फूट उंच पूलावरून कोसळला ट्रक, चालक जागेवर ठार
दरम्यान, अशाच एका घटनेत 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. नाशिक येथे घंटागाडीनं धडक दिल्यानं तरुणीचा मृत्यू झाला आहे. रोशनी केदारनाथ जैस्वाल असं मृत तरुणीचं नाव आहे. रोशनी ही नियमित जॉगिंग करण्यासाठी सातपूर क्लब हाऊसच्या मैदानावर जात होती. त्या घंटागाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. स्टेरिंग लॉक झाल्यानं घंटागाडीनं रोशनीला उडवलं. यात रोशनी जमिनीवर कोसळून तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. घंटागाडीचं एक चाक रोशनीच्या पायावरून गेलं. रोशनीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान रोशनीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.