मुंबई, 30 डिसेंबर : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी विरोधकांनी विधानसभेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला. मात्र या प्रस्तावाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मविआमध्ये मतभेद झाले आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहेत. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी असं काहीही नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांची प्रस्तावावरील सही हा तांत्रिक मुद्दा असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. नार्वेकरांवर हल्लाबोल दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल नार्वेकर विरोधक आमदारांना बोलू देत नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी असं पक्षपाती वागणं चुकीचं आहे. सर्वांना समान न्याय मिळायला हवा, त्यामुळे महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. हेही वाचा : ‘मविआ’मध्ये पुन्हा मतभेद? ‘त्या’ प्रस्तावाची अजित पवारांना माहितीच नाही! सीमा प्रश्नावर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली. बेळगाव आणि कर्नाटकच्या इतर सीमावर्ती भागात मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे. त्यामुळे हा प्रदेश क्रेंद्रशासित करावा अशी आमची मागणी आहे. मुंबईमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक राहात. सर्व आनंदाने राहात आहेत, मुंबईमध्ये अत्याचार होतो अशी कोणत्याही कन्नड भाषिक व्यक्तीची तक्रार नाही, त्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी करणं मुर्खपणाचं असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.