नागपूर, 30 डिसेंबर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र त्यापूर्वीच गुरुवारी महाविकास आघाडीकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला आहे. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना विचारले असता मला अविश्वास ठरावाबाबत माहित नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमकं काय म्हटलं अजित पवार यांनी? महाविकास आघाडीकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता मला विधानसभा अध्यक्षांच्याविरोधातील ठरावाबाबत माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी सभागृहात गेलो होतो, मात्र मला याबाबत काही माहिती नाही. माझ्यामते मला समजते त्यानुसार अध्यक्षांवर एक वर्षाकरता अविश्वासाचा ठराव आणता येत नाही. त्यामुळे मी याबाबत आधी माहिती घेतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाआधी महाविकासआघाडीची खेळी, राहुल नार्वेकरांनाच खिंडीत गाठलं! महत्त्वाच्या नेत्यांची अनुपस्थिती या प्रस्तावावेळी महाविकास आघाडीच नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे हे देखील दिसले नाहीत. प्रांताध्यक्षांवर कारवाई झाल्यानं ते देखील उपस्थित नव्हते. जर माझी संमती असती तर माझी तिथे सही असती, त्यामुळे मला या प्रस्तावाबाबत कुठलीही माहिती नाही. माहिती घेऊन बोलतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र अजित पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.