अहमदनगर, 28 ऑगस्ट : ‘आरोग्याचा विषय बाजूला ठेवला तर आपल्या मंदिरांच्या आजूबाजूला असलेली दुकाने आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थकारण आणि धार्मिक भावना पाहता मंदिरे उघडावीत, असं माझं मत होतं. मात्र आपल्या मंदिरामधील गाभारा हा खूप छोटा असतो. लोकांच्या भावना पाहता मंदिरातील गर्दी वाढेल. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि अजितदादा निर्णय घेतील. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निर्णय होऊ शकतो असे मला वाटतं,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मंदिरे उघडण्याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. सुशांतसिंह प्रकरणावर प्रतिक्रिया सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कदाचित देवेंद्र फडणवीस यांना असे सांगायचे असेल की सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलल्या आहेत. त्या त्यांना पचनी पडलेल्या दिसत नाहीत. सुप्रीम कोर्टावर त्यांनी आक्षेप घेतला आहे, असं मला वाटतं. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे असे सांगितले आहे की महाराष्ट्र पोलिसांनी जे योग्य करायला पाहिजे होते ते केलेले आहे. महाराष्ट्रातील काही लोकांनी त्यामध्ये राजकारण केले आहे. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे देत आहोत असे स्पष्ट मत कोर्टाने नोंदवले आहे. त्यामुळे भाजप फक्त राजकारण करत आहे,’ असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. परीक्षांबाबत काय म्हणाले रोहित पवार? ‘सुप्रीम कोर्टाने परीक्षा घ्यायचे किंवा नाही घ्यायच्या यावर निकाल दिला आहे. सरकार आणि युजीसी एकत्र बसून निर्णय घेतील. हे जर लोकांच्या आणि जनतेच्या हिताचे निर्णय असतील तर हा चांगला निर्णय आहे आणि चांगल्या निर्णयासाठी कुणी हट्ट केला तर ते चुकीचं नाही. आम्ही राजकारण करण्यासाठी राजकारण करत नाही मात्र भाजप कुठल्याही विषयावरती राजकारण करतं,’ अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.