• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भाजप नेत्यांच्या कार्यक्रमात अचानक शिवसेना खासदाराची एण्ट्री, शहरात युतीच्या शक्यतेची चर्चा

भाजप नेत्यांच्या कार्यक्रमात अचानक शिवसेना खासदाराची एण्ट्री, शहरात युतीच्या शक्यतेची चर्चा

या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी केलेलं एक वक्तवही चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:
कल्याण, 26 जानेवारी : कल्याणमध्ये भाजप नेत्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अचानक एण्ट्री करत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसंच या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी केलेलं एक वक्तवही चर्चेचा विषय ठरत आहे. 'आता सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढलं नाही पाहिजे असे,' असे वक्तव्य खासदार शिंदे यांनी भाजपच्या कार्यक्रमात केले असल्याने आता एकच चर्चा रंगू लागली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये हे युतीचे संकेत तर नाही ना? असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे.  पत्रीपुलाजवळील पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाचे आज नामकरण करण्यात आले. सदर कार्यक्रम भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाला डोंबिवली भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रम ठिकाणाच्या परिसरातूनच खासदार शिंदे हे जात होते. या कार्यक्रमाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपली गाडी थांबवित कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली. भाजपच्या या कार्यक्रमामध्ये खरे तर खासदार शिंदे यांना निमंत्रण नव्हते, मात्र तरीही तेथून न थांबता निघून जाणं त्यांना योग्य वाटले नसल्याचं सांगत ते या कार्यक्रमात सहभागी झाले. हेही वाचा - धनंजय मुंडे झाले भावुक, मोठ्या वादंगानंतर पहिल्यांदाच साधला मनमोकळा संवाद यावेळी स्थानिक नागरिकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधताना आता कितीही सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढलं नाही पाहिजे असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणूकीत शिवसेना आणि भाजपमध्ये परत युती होते का? अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.  कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेक वर्षे शिवसेना भाजपची सत्ता आहे. मागच्या निवडणुकीध्ये सेना भाजप हे भले एकमेकांविरोधात लढले असले तरी निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवला. गेल्या वर्षभरापासून चित्र बदललेले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्रित लढणार का? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कल्याण डोंबिवलीत काँग्रेस राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. तरीही राष्ट्रवादीकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना काय भूमिका घेते आणि आगामी काळात काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.
Published by:Akshay Shitole
First published: