बीड, 26 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईतील एका महिलेकडून बलात्काराची तक्रार करण्यात आली आणि नंतर मागेही घेण्यात आली. मात्र या सगळ्या घटनाक्रमात धनंजय मुंडे यांच्याबाबत राज्यभर मोठी चर्चा झाली. या नाट्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या धनंजय मुंडे यांचे शिरूर कासार येथील नागरिकांनी जंगी स्वागत केले. त्यांच्यावर चक्क जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली.
या स्वागताने भारावलेल्या धनंजय मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्यावर जेव्हा केव्हा कठीण प्रसंग ओढवला तेव्हा तुम्ही लोकांनी मला खंबीरपणे साथ दिली. यावेळी देखील तुम्हीच माझ्या पाठीशी उभे राहिला. तुमचे उपकार न फिटणारे आहेत, असं म्हणत मुंडे हे भावुक झाले.
रेणू शर्मा प्रकरणानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या धनंजय मुंडे यांनी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. बीड तालुक्यातील खोकरमोहा ग्रामपंचायत कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी नागरिकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
'कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी माझ्या पाठीशी साथ उभी केली. मी शब्दात आभार मानू शकत नाही. आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याचे जोडे करून जरी आपल्याला घातले तरीही ती फिटू शकत नाही. आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. जीवनामध्ये मी कोणाचेही मन दुखवून स्थान निर्माण केले नाही. मन जिंकून मी स्थान निर्माण केलं आहे', असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Dhananjay munde