मुंबई, 8 सप्टेंबर : आपल्या आयुष्यात प्रचंड अडचणी असतात. या अडचणींवर मात करुन आपल्याला पुढे जायचं असतं. संघर्ष करायचा असतो आणि जिंकायचं असतं. आपलं स्वप्न आपल्याला साकार करायचं असतं. स्वप्न साकार करण्याचा प्रवास हा सोपा नसतो. या प्रवासात आपल्याला प्रचंड झळा बसतात. ठिकठिकाणी ठेच लागते. काही वेळा आपल्याला यश मिळत नाही म्हणून आपल्या मनात पुढे जायचं नाही, आहोत तिथेच थांबूया, असा विचार येतो. आपल्याला हवं असणारं यश प्राप्त होत नाही म्हणून आपण नैराश्यात जातो. पण या नैराशाच्या जाळ्यातून बाहेर पडल्यानंतर आपण जिद्दीने बाहेर पडलो आणि जोमाने कामाला लागतो तर आपण नक्की यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पीएसआय अधिकारी संग्राम मालकर! संग्राम यांनी यूट्यूबवरील ‘वास्तव कट्टा’ या चॅनलला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी आपला जीवन प्रवास उलगडून सांगितला.
संग्राम मालकर हे मुळचे पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील उदूर गावाचे. संग्राम मालकर यांना शालेय जीवनात अभ्यासाची अजिबात आवड नव्हती. त्यांना अभ्यास करायला आवडायचं नाही. त्यांना दहावीत अवघे 60 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर अकरावती अवघे 35 टक्के गुण मिळाले होते. ते त्यावेळी काठावर पास झाले होते. त्यानंतर बारावीत ते 47 टक्क्यांनी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं. या काळात त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि त्यांचं आयुष्याचं गणितच बदललं. या दरम्यान त्यांना मोठ्या भावाने मार्गदर्शन केलं आणि त्यांचा एक सच्चा संयमी माणूस बनण्याचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास पीएसआय अधिकारी बनेपर्यंत सलग सहा वर्षे अवितरत सुरु राहिला. त्यांचा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे. संग्राम मालकर यांचे कुटुंबिय शेती करायचे. आपणदेखील दहावीनंतर शेती सांभाळून कला शाखेतून शिक्षण करावं असा त्यांनी विचार केला. पण कुटुंबियांनी त्यांना विज्ञान शाखेतून शिक्षण करण्याचा सल्ला दिला. नापास झाला तरी चालेल पण विज्ञान शाखेतून शिक्षण कर, असं वडील म्हणाले. त्यामुळे संग्राम यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. संग्राम अकरावीत अवघे 35 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले. बारावीत 47 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले. बारावीनंतर नेमकं काय करावं या विचाराने त्यांचा जीव भांड्यात पडला. विज्ञान शाखेत पुढच्या शिक्षणासाठी महाविद्यालये भरघोस डोनेशन मागत होते. अखेर संग्राम यांनी कुटुंबियांच्या सल्ल्यानुसार हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा निर्णय घेतला. ( नियतीने नेत्र हिरवले, मनाने दुनिया पाहिली, डोळ्यांमधून टचकन पाणी आणणारी IAS प्रांजल पाटील यांची कहाणी ) संग्राम मालकर 2009 मध्ये पुण्यात आले. त्यांनी शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतलं. त्यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक इंग्रजी आणि हिंदीत बोलायचे. पण संग्राम यांना इंग्रजी येत नव्हती. शिक्षण करत असताना 2010 साली वडिलांचं निधन झालं. त्यामुळे संग्राम प्रचंड खचले. संग्राम यांचं वडील असताना ध्येय वेगळं होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी सिंगापूर येथील हॉटेलमध्ये जायचं. तिथलं तंत्रज्ञान शिकायचं आणि पुण्यात येवून हॉटेल टाकायची, असं ध्येय होतं. पण वडिलांच्या निधनानंतर संग्राम यांच्या आई घरी एकट्या होत्या. कारण त्यांचे मोठे भाऊ ठाणे पोलिसात कर्तव्य बजावत होते. त्यामुळे संग्राम यांना आईला सोडून परदेशात जाणं योग्य वाटलं नाही. संग्राम यांचं 2012 साली पदवी शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. त्यांनी दोन वर्ष शेती केली. 2012 साली मोठ्या भावाची ठाणे शहर पोलीस खात्यात निवड झाली. त्यांना मोठ्या भावाने एमपीएससीची परीक्षेचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ते 2014 साली पुन्हा पुण्यात आले. त्यांनी स्टडी सर्कल क्लासची मदत घेतली. तिथे असलेल्या शिक्षकांनी त्यांना पीएसआय भरतीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. मी दोन महिने स्टडी सर्कलला बसलो. त्यानंतर एकही क्लास लावला नाही. फक्त मोठ्या भावाने सल्ला दिला, असं संग्राम यांनी सांगितलंय. 2016 पर्यंत पीएसआयची भरतीच निघाली नाही. त्यामुळे संग्राम यांचे अडीच वर्षे खूप अडचणीत गेले. जवळचा मित्र परिवार तुटला. नातेवाईक विचारायचे. घरी शेती करण्याचा सल्ला द्यायचे. काही नातेवाईकांनी आईकडे लहान मुलाला शेती करु द्या, अशी विनंती केली. पण आई आणि भावाने खमकी साथ दिली. त्यामुळे संग्राम अभ्यास करत राहिले. या काळात संग्राम थोडे नैराश्यात गेले होते. त्यांनी लोकांमुळे फोन वापरायचा बंद केला होती. (व याच्या 14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षात दोन मुलं, मुंबईच्या धडाकेबाज IPS अधिकारी एन. अंबिका यांची प्रेरणादायी कहाणी ) पीएसआय भरतीची 2016 साली जाहिरात आली. संग्राम यांना आधी 41 गुण मिळाले. पण एका गुणासाठी मेरीट गेली. ते आतून खूप खचले. त्यावेळी त्यांना एका गुणाची किंमत समजली. त्यांनी त्यावेळी वाचनायला जाणंही सोडलं. त्यांच्या मनात नकारात्मक विचार यायचे. त्यावेळी एका मित्राने त्यांच्या मनाची समजूत केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यासात प्रयत्न सुरु केले. 2017 साली पुन्हा पीएसआयची जाहिरात आली. संग्राम वाचनालयात सकाळी सात ते रात्री नऊ किंवा बारापर्यंत अभ्यास करायचे. त्यांचे वाचनालातली मित्र वेडा झालाय, असं संबोधायचे. संग्राम यांनी 16 जुलै 2017 रोजी पेपर दिला. संग्राम पेपर चांगला गेला म्हणून खूश होते. पण अचानक त्यांना घरुन फोन आला. संग्राम कुठे आहेस? आईला अॅडमीट केलंय. घरी ये. संग्राम यांच्या आईच्या मेंदूजवळ चरबीची गाठ झाली होती. त्यामुळे ऑपरेशन करावं लागलं होतं. त्यांच्या आई त्यावेळी 15 दिवस आयसीयूत दाखल होत्या. ते दोन महिने आईजवळ होते. पूर्व परीक्षेचा तोपर्यंत निकाल लागला होता. त्यांना पूर्व परीक्षेला 56 गुण मिळाले होते. पण 2017 ला पीएसआय मेन्स परीक्षेत अपयश आलं. 2018 साली 383 जागांची जाहिरात आली. तेव्हा त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांच्या मेहनतीला अखेर यावेळी यश आलं आणि ते पीएस बनले. ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी ते शेतात काम करत होते. त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना याबाबतची गुडन्यूज दिली होती. त्यांच्या भावाच्या त्या एका फोन कॉलनंतर संग्राम यांचं आयुष्य खूप बदललं. संग्राम आज तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्ती आहेत. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा अनेकांवर प्रभाव पडलाय. अनेक तरुण त्यांच्या प्रवासाकडे पाहून पीएसआयच्या भरतीसाठी प्रयत्न करत असतात.