मुंबई 30 ऑगस्ट : हसणं (Laugh) हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे अनेक लोक मनसोक्त हसत नाहीत. पण हसणं हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय आहे. हसण्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. हे फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत. तुम्ही एका गोड स्मितहास्याने अनेक समस्यांवर मात करू शकता. हसणं तुमचे नातेसंबंध दृढ करण्यासही मदत करतं. हास्य हे तुमच्या सर्वांत शक्तिशाली साधनांपैकी एक आहे. एक गोड स्मितहास्य आरोग्य सुधारण्यासाठी, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि बरं वाटण्यासाठी खूप मदत करतं. अनेक समस्यांवरील उपाय एक गोड स्माईल असते. हसणं आणि हसण्याचे फायदे, यावर आतापर्यंत अनेक रिसर्च झाले आहेत. एका रिसर्चनुसार, अमेरिकन लोक इतर देशांतील लोकांपेक्षा जास्त आणि मोठमोठ्याने हसतात. मोठमोठ्याने आवाज करून हसणं हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगलं आहे. या संदर्भात axios.comने वृत्त दिलंय. लहान वयातच तुमचं मूल प्रेमात पडलंय? चिडून, रागावून, ओरडून फायदा नाही, अशा प्रकारे हाताळा परिस्थिती विज्ञान हसण्याचे अनेक फायदे सांगतं. त्यामध्ये प्रामुख्याने तणावमुक्ती, वेदनांपासून आराम आणि नातेसंबंध मजबूत होणं, यांचा समावेश होतो. तसंच जेव्हा लोक हसतात तेव्हा ते जास्त आकर्षक वाटतात, असंही संशोधन सांगतं. हसल्याने वेदना होतात दूर धावताना हसणं तुम्हाला अधिक कार्यक्षम बनवतं, असं एका संशोधनातून दिसून आलंय. आपलं हास्य आपण ठिक आहोत, असे संकेत आपल्या मेंदूला देतात. त्यामुळे पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात. आपण इन्जेक्शन घेताना हसलो, तर त्या सुई टोचण्याच्या वेदना कमी होऊ शकतात, असंही एका अभ्यासात दिसून आलंय. तणाव कमी होतो तुम्ही तणावात असाल आणि हसलात तर तुमचं शरीर तुमच्या हसण्याला सकारात्मक प्रतिक्रिया देतं, असं कॅन्सस विद्यापीठातील (University of Kansas) संशोधकांना आढळून आलंय. हसल्याने तुमच्या हृदयाची गती सामान्य होते आणि तुमचा ताण कमी होऊ लागतो. तुम्हाला हसावं वाटत नसेल तरीही जोपर्यंत तुम्हाला खरोखर हसायला येत नाही, तोपर्यंत तुम्ही खोटं खोटं हसायला हवं, असा सल्ला संशोधक देतात. जोडीदाराविषयी आदर कसा व्यक्त कराल? आनंदी आयुष्यासाठी जाणून घ्या टीप्स अमेरिकन लोक जास्त का हसतात? अमेरिकन लोक खूप हसतात, याचं एक कारण म्हणजे त्यांच्या देशाची विविधता आहे. “अमेरिकेत जगभरातील लोक राहतात. त्यामुळे विविध देशांमधून आलेल्या लोकांचा संवाद हा गैर-मौखिक असतो. त्यामुळे तिथले लोक अधिक हसतात,” असं ओल्गा खझान (Olga Khazan) ‘द अटलांटिक’मध्ये (The Atlantic) लिहितात. व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेसच्या (Wharton School of Business) मते, कामावर असताना हसल्याने तुम्ही अधिक विश्वासार्ह दिसू शकता आणि तुमच्या सहकर्मचाऱ्यांसोबतचे बाँड अधिक दृढ करू शकता. आपल्या देशात अनेक लाफ्टर क्लब आहेत. हसणं विकत घेता येत नाही. त्यामुळे छोट्याछोट्या गोष्टींवर चिडचिड करण्याऐवजी एक गोड स्माईल देऊन फरक पाहा. आणि हो पुढच्या वेळी तुम्ही मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकला असाल, त्यावेळी चिडचिड करण्याऐवजी, हॉर्न वाजवण्याऐवजी एकदा हसून बघा आणि फरक पाहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.