मुंबई, 13 मार्च : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच आहे. आता तर मातोश्रीच्या अत्यंत जवळचे असलेल्या सुभाष देसाई यांच्या मुलाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांची साथ द्यायचा निर्णय घेतला आहे. सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या टीममध्ये काम केलं होतं, तसंच ते 2014 च्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये आणि महाविकासआघाडी सरकारमध्येही उद्योगमंत्री होते. विधान परिषदेचे आमदार असलेल्या सुभाष देसाई यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेनेने त्यांना पुन्हा आमदारकी दिली नाही. सुभाष देसाई हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांचा मुलगाच शिंदेंकडे जात असल्यामुळे हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. ‘भूषण देसाई यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच मी अभिनंदन करतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी निर्णय घेतला तेव्हा 50 आमदार आणि 13 खासदार सोबत आले आणि शेकडो नगरसेवक, पंचायत समिती सदस्य मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी एकत्र आले. सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी आम्ही घेतलेल्या भूमिकाला समर्थन दिलं आहे’, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ‘गजानन किर्तीकर, रामदास कदम, प्रतापराव जाधव आहे, ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलं, ते आपल्या सोबत आले आहे. या महाराष्ट्रामध्ये जे काम आम्ही करतोय. सर्वसामान्य लोकांना आम्ही न्याय देतो, बजेटमध्येही लोकांना दिलासा दिला’, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.