सातारा, 09 एप्रिल : बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जाणारे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी कोरोनाबद्दलही (Coronavirus pandemic) अत्यंत थेट मत मांडलं आहे. साताऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी लॉकडाऊनला विरोध (Udayan Raje on corona lockdown) करत व्यापाऱ्यांच्या भूमिकेचं थेट समर्थन केलं. तसंच लसीच्या कमतरतेबाबत बोलतानाही त्यांनी अगदी स्पष्टपणे मत मांडलं. कुटुंब नियोजन केलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असं ते म्हणाले. (Statement of Udayanraje Bhosle about family planning)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना करताना विविध नियम, निर्बंध लावले जात आहे. मात्र त्यापैकी बहुतांश नियमांना व्यापारी वर्गाचा विरोध होताना दिसतोय. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यापाऱ्यांसह जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतली. व्यापारीवर्ग आर्थिक अडचणीत येत असल्याचं सांगत त्यांनी निर्बंध कमी करण्याची मागणी केली. मात्र राज्य सरकारचा आदेश असल्यामुळं आपण निर्बंध हटवू शकत नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी व्यापाऱ्यांच्या भावना सर्वांसमोर मांडल्या.
व्यापाऱ्यांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळं (Covid-19 restrictions) त्यांच्यावर, त्यांच्याकडे काम करत असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन (Weekend Lockdown) हा फक्त शनिवारी आणि रविवारीच बाहेर येतो का? असं विचारत त्यांनी सरकारच्या नियमांवर टीका केली. मी जर व्यापारी असतो तर काहीही झालं तरी दुकान बंद केलं नसतं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. सरकारनं योग्य तो मार्ग काढून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करताना सरकारच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले.
वाचा - BREAKING: ठरलेल्या तारखेलाच होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा- सूत्र
लसीकरणासाठी वयाची अट कशाला?
व्यापारी आणि कामगारांच्या लसीकरणासाठी वयाची अट काढून टाकावी आणि त्यांचे लसीकरण करून व्यापाऱ्यांना व्यवसाय करू द्यावा असा सल्ला त्यांनी दिला. मी मेडिकलचा विद्यार्थी नाही, पण मला कॉमन सेन्स आहे असंही यावेळी उदयनराजे म्हणाले. वेळीच यावर निर्णय झाला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. पोलिस यंत्रणाही लोकांना किती दिवस अडवणार, शेवटी पोलिसांची संख्या लोकांपेक्षा कमी आहे, असा इशारा द्यायलाही उदयनराजे विसरले नाहीत. रोज नवीन नियम येतात, त्याला लोक कसे सामोरे जाणार, लोक एक, दोन दिवस लोक वाट पाहतील नंतर त्यांना कोणीही अडवू शकणार नाही, असं उदयनराजे यांनी स्पष्टपणे सांगितल आहे.
वाचा -कोरोनाची लस घेणाऱ्यांसाठी अजब ऑफर! मिळवा मोफत जेवण, दारू आणि बरंच काही
कुटुंब नियोजन केलं असतं तर...
कोरोनाच्या लसीच्या कमतरतेबाबत बोलताना उदयनराजे यांनी यावर वाद निर्माण होणं चुकीचं असल्याचं म्हटलं. लोकसंख्येनुसार राज्यांना लसीचं वाटप व्हावं अशी भूमिका त्यांनी मांडली. दुसरीकडे, प्रत्येकानं कुटुंब नियोजन केलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली असती का असा मिश्कील सवालही त्यांनी केला.
'स्वतःची काळजी स्वतः घ्या'
कुठे कधी कशी परिस्थिती निर्माण होईल हे कोणाच्याही हातात नाही. प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभावे पण जन्माला येतो त्याला एक दिवस जावेच लागते. आपण जर स्वतः काळजी घेऊन आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवली तर तुम्हाला काही होणार नाही. यापूर्वीही अनेक व्हायरसने अनेक लोकांचा मृत्यू जालाय. पण प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी असं, उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.