मुंबई 09 एप्रिल : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जगभरात या विषाणूचा फैलाव झपाट्यानं होत असून अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहिमेचा (Covid Vaccination) वेग वाढवण्यात आला आहे. अशात अनेक देशांमध्ये लोकांना कोरोना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारी आणि खासगी कंपन्या विविध ऑफर देत आहेत. यात हॉटेलमध्ये मोफत जेवणापासून मोफत बीअर, स्वस्त दारू आणि गांजापर्यंतच्या ऑफरचा समावेश आहे. प्रसिद्ध उबर (Uber) कॅब सर्व्हिसनंही खास ऑफर दिली आहे. यात ते 1.5 रुपयांपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा देत आहे. यातून लोक लस घेण्यासाठी मोफत कॅबनं जावू शकतात.
दुसरीकडे अमेरिकेच्या ओहियो येथील मार्केट गार्डन ब्रूवरीने लस घेणाऱ्या पहिल्या 2021 लोकांना पाच वेळा मोफत बिअर पाजण्याची ऑफर दिली आहे. चीनमध्येही लसीकरणासाठी सरकार आणि कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. तर हेनान राज्यातील सरकारनं लस न घेणाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यासोबत त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क आणि घरही जप्त केलं जाईल, अशी धमकी दिली आहे.
अमेरिकेतही मॅक डोनल्ड्स, AT&T., इन्साकार्ट, टारगेट, ट्रेडर जोस, कोबानी यासारख्या कंपन्यांनी लस घेणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या आणि पैसे देण्याची घोषणाही केली आहे. इतकंच नाही तर लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना 30 डॉलर म्हणजेच 2200 रुपयांपर्यंतच भाडं देण्याचीही घोषणा केली आहे.
अमेरिकेतीलच प्रसिद्ध असलेल्या क्रिस्पी क्रीम या डोनट कंपनीनं लस घेणाऱ्यांसाठी 2021 पर्यंत दररोज मोफत डोनट देण्याची घोषणा केली आहे. यासाठी लोकांना केवळ मॉडरेना, फाइजर किंवा जॉनसन अॅण्ड जॉनसन व्हॅक्सिन घेतल्याचं कार्ड दाखवावं लागेल. मिशिगनमधील मेडिकल मारिजुआना म्हणजेच गांजा विकणाऱ्या कंपनीनं लस घेणाऱ्या लोकांना मोफत रोल्ड जॉईंट म्हणजेच गांजा देण्याचं आश्वासन दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.