मुंबई, 09 एप्रिल : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन हा घोळ अखेर संपुष्टात आला आहे. तंत्रज्ञानाच्या अभावामुळं ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नसल्यामुळं यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच (Offline exam for 10th and 12th)होणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आयटी तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय समोर आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा दहावी आणि बारावीच्या परीक्षा या महिन्यात सुरू होणे अपेक्षित आहे. त्यामुळं कोरोनाच्या संकटामुळं विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा विचार करता ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य आहे का? याची चाचपणी राज्य सरकारकडून करण्यात आली. त्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी आयटी कंपन्यांशी आणि आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. मात्र अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा तयार करण्यास आयटी कंपन्यांनी असमर्थता दर्शवली आहे. वाचा - उसाचा रस पिण्यासाठी भर रस्त्यात थांबवली कोरोना बाधित रुग्णाची Ambulance राज्यात 10 वीचे 16 लाख विद्यार्थी आहेत, तर 12 वीचे 14 लाख विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता यावी यासाठी सॉफ्टवेअर, प्रश्नपत्रिका आणि नेटवर्क उभं करावं लागेल. ही संपूर्ण तयारी करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी जाईल असं आय टी कंपन्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं ऑनलाईन परीक्षा घेण्याचा पर्याय तूर्तास बंदच झाला आहे. त्यामुळं परीक्षा ऑफलाईनच होणार हे स्पष्ट आहे. वाचा - MPSC परीक्षा पुढे ढकलल्यानंतरही सरकारचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा बारावीची परीक्षा 23 एप्रिलला तर 10वीची परीक्षा 29 एप्रिलला नियोजित आहे. पण कोरोनाची स्थिती पाहता परीक्षांच्या तारखांबाबत निर्णय घेण्यासाठी वर्षा गायकवाड लोकप्रतिनिधींशी चर्चा करत आहेत. राज्यात कोरोनाचं संकट असलं तरी सरकारनं लावलेल्या कडक निर्बंधांमुळं 23 एप्रिलपर्यंत कोरोनाची स्थिती नियंत्रणात येईल अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींना आहे. त्यामुळं परीक्षा नियोजित तारखांनाच घेण्याची मागणी होतेय. त्यामुळं शिक्षण विभागानेही परीक्षांसाठी तयारीला सुरुवात केली आहे. परीक्षा होणार की नाही ही टांगती तलवार असली तरी शिक्षण विभागानं मात्र तयारी पूर्ण केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.