मुंबई, 9 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे 11 एप्रिल 2021 रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा 2020 (MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, तसंच परीक्षा फॉर्म भरतानाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हेही वाचा - मुंबईत weekend lockdown मध्ये कसे असणार नियम? महापालिकेने जारी केल्या नव्या सूचना दरम्यान, या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह आयोगाचे प्रभारी सचिव संघ तवरेज आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत उपस्थितांना राज्यातील कोरोना स्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यसचिवांनी दिली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित सर्व मंत्री आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी साकल्याने चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांचीही मागणी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.