नांदेड, 06 मार्च : इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. 23 मार्चपर्यंत ही परीक्षा असणार आहे. विशेष म्हणजे तीन शेतकरी महिलांनी दहावीची परीक्षा देऊन नवा आदर्श समोर ठेवला आहे. कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून यांच्या पतीनं आत्महत्या केली होती. पतीच्या मृत्यूनंतर कोलमडून न जाता तीनही विधवा शेतकरी महिलांनी शिक्षणाची कास धरली आणि दहावीच्या परीक्षा देत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी सुनिता कदम, मालेगाव येथील मंगला इंगोले आणि अर्धापूर इथल्या लक्ष्मी साखरे यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं घराचा मोठा आधार गेला होता. मात्र समोर आलेल्या संकटापासून न डगमगता सामना करत त्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. त्यांच्या या जिद्दीने अनेक मुलींसह महिलांना नवा आदर्श घालून दिला आहे असं म्हणायला हवं.
हे वाचा- आता 'कोरोना'च माणसांना घाबरणार; हे कवच घातल्यावर व्हायरस जवळही येणार नाही
कोणत्याही स्थितीत हार न मानता जिद्दीच्या जोरावर त्यांनी शिक्षण घेण्याचा निश्चय केला आहे. मुलांना शिक्षण देताना त्या स्वत:ही अभ्यास करत होत्या याशिवाय पती नसल्यानं घराची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यामुळे सगळी परिस्थिती सांभाळून धीर न सोडता त्यांनी केलेल्या या कामाचं गावापासून ते सोशल मीडियापर्यंत सर्व स्तरावर कौतुक केलं जात आहे.
सर्व सुखसोई आणि सुविधा असतानाही अनेकवेळा शिक्षणाची गोडी नाही म्हणून अर्धवट सोडलं जातं मित्र इथे शेती, घरची जबाबदारी आणि पतीच्या मृत्यूनंतर सर्व सांभाळून अभ्यास करून दहावीची परीक्षा देणाऱ्या या तीन महिलांचं आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक करावं तेव्हढं थोडं आहे.
हे वाचा-'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही तर...' मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका