उदय जाधव, प्रतिनिधी मुंबई, 17 मे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे, त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये निवडणुकीमध्ये भाकरी फिरवण्याबाबतची चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे मुंबईतून नवे उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत, यात प्रकाश आंबेडकर यांचं नावही आता समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गट दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांना उमेदवारी द्यायच्या तयारीत आहे, अशा चर्चा सुरू आहेत. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून मागच्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांचा विजय झाला होता, पण आता राहुल शेवाळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. आंबेडकरांची प्रतिक्रिया दक्षिण-मध्य मुंबईतून निवडणूक लढणार का? याबाबत प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘ती जागा आमच्याकडेच होती, रामदास आठवले तिथूनच निवडून आले होते. नंतर ती जागा आम्ही सोडून दिली होती, त्यामुळे नवीन नाहीये. त्या जागेवर प्रभाव आहे. मागणार का नाही मागणार, हे त्यावेळेस ठरेल. अजून यामधलं राजकारण व्हायचं आहे, समिकरणं आज दिसत आहेत, तशीच राहतील असं सांगता येत नाही. यामध्ये काही जण गळतील काही जण नव्याने येतील, अशी परिस्थिती आहे’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याऐवजी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाला पसंती असल्याचं सांगण्यात येतं आहे. तर अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून, भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात उतरण्यात येऊ शकतं. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून माजी महापौर आणि विद्यमान प्रतोद सुनिल प्रभू यांना उमेदवारी देण्याची तयारी करत आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘न्यूज18 लोकमत’ला दिली आहे. ‘पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्यांचा….’, शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितला पुढचा धोका! शिवसेना ठाकरे गट ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून माजी खासदार संजय दिना पाटील किंवा महाविकास आघाडीत जागावाटपात अदलाबदल झाल्यास दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्या संदर्भात अंतीम चर्चा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या सर्व 6 जागांवर भाजप-शिवसेना युतीचा विजय झाला होता. मुंबई उत्तर-पश्चिममधून गजानन किर्तीकर, मुंबई दक्षिण-मध्य मधून राहुल शेवाळे आणि मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत खासदार झाले. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर गजानन किर्तीकर आणि राहुल शेवाळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.