मुंबई, 17 मे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच पक्षाचे इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी कर्नाटक निवडणूक निकालाचे विश्लेषण केले. काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पराभवाला सामोरं जावं लागलं, असं शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांना म्हणाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटकमध्ये भाजपने धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जनतेने नाकरले. आमदार फुटून जाऊन भाजपला मदत करतील अशी स्थिती मतदारांनी ठेवली नाही. काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले. यातून मतदारांचा कौल दिसून येतो, हे शरद पवारांनी पक्षातील नेत्यांना सांगितलं. मागच्या काही काळापासून राष्ट्रवादीचे आमदार पक्षात अस्वस्थ असून भाजपसोबत जाऊ शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा विचार करणाऱ्या नेत्यांना शरद पवारांनी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील परिस्थितीचा अंदाज देत धोक्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस सोडून भाजपबरोबर गेलेल्या किंवा भाजपला मदत करू शकणाऱ्यांना जनतेने नाकरले आहे, असं विश्लेषण शरद पवारांनी या बैठकीत केलं. पवारांनंतर ठाकरेही भाकरी फिरवणार, मुंबईतले लोकसभा उमेदवार ठरले! राष्ट्रवादीचं मिशन लोकसभा या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या मिशन लोकसभालाही सुरूवात झाली आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष आहे, त्या मतदारसंघांची जबाबदारी पक्षाच्या वतीनं नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. नागपूर विभागाची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमरावती विभागाची जबाबदारी राजेंद्र शिंगणे यांच्या कडे देण्यात आली आहे. तर नाशिक अहमदनगरसह मराठवाडा विभागाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. पुणे विभागाची जबाबदारी सुनील शेळके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये अशोक पवार तर खानदेशची जबाबदारी एकनाथ खडसे आणि अनिल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोकण विभागाची जबाबदारी अनिकेत तटकरे आणि शेखर निकम यांच्याकडे देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.