मुंबई, 11 नोव्हेंबर : उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्येच आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर लगेचच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांची पक्षविरोधी कारवाई केली, म्हणून पक्षातून हकालपट्टी केली आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करताना गजानन किर्तीकर यांनी मागच्या 11 वर्षांमधली त्यांची खदखद बोलून दाखवली आहे. गजानन किर्तीकर यांचं एक पत्रच समोर आलं आहे, यामध्ये त्यांनी आपण उद्धव ठाकरेंची साथ का सोडली, याची कारणं सांगितली आहेत. काय आहे किर्तीकरांच्या पत्रात? अडीच वर्ष महाविकासआघाडीचं सरकार, म्हणजे सरकार ठाकरेंचं आणि चालवतात पवार, असं चित्र होतं. महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात शिवसेना आमदार, जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांना राजकारणात दुय्यम स्थान मिळत होते. प्रशासकीय अधिकारी व पोलीस शिवसैनिकांना जुमानत नव्हते. परिणामी हा उठाव झाला. उद्धवजींनी मातोश्रीवर शिवसेना सर्व खासदारांची बैठक घेतली असता काँग्रेस-राष्ट्रवादीची सोबत सोडून पुन्हा भाजपसोबत युती करावी, अशी एकमुखी मागणी आम्ही केली. ही मागणी मान्य न केल्यामुळे 12 खासदार शिंदे गटात सामील झाले, त्यानंतर आता मीही दाखल होत आहे. उद्धवजींचा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा प्रवास उद्धव गटासाठी घातक आहे, हे भाबड्या शिवसैनिकाला कळत नाही. आता त्यांनी वेळीच उठाव करावा.
शिवसेनेतील 56 वर्षांच्या कारकिर्दीत मी बाळासाहेबांसोबत काम केलं. बाळासाहेबांनीही कार्यकर्त्यांची क्षमता ओळखून प्रत्येकाला योग्यवेळी संधी दिली. उद्धवजींनी पक्षाची सूत्र हातात घेतल्यानंतर चुकीच्या माणसाजवळ गेले. त्यांचे सल्ले ऐकून चुकीचे निर्णय घेतले गेले, त्यामुळे संघटनेचे नुकसान झाले. 2004 आणि 2009 लाही मला उमेदवारी देताना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पद वाटप करताना जवळच्या व्यक्तींना महत्त्वाची पदं दिली गेली. विनायक राऊत यांना गटनेता आणि अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्री करताना माझ्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकाला डावललं गेलं. बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून 11 वर्ष आम्हाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला. या पद्धतीने आम्हाला 11 वर्ष उद्धवजींच्या नेतृत्वात काम करावं लागलं.