दापोली, 20 जानेवारी : कोकणामध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार आहे. या भूकंपाचा फटका बाळासाहेबांच्या शिवसेनेत शिंदे गटात गेलेल्या आमदार योगेश कदम आणि रामदास कदम यांना बसणार आहे. रामदास कदम यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत. आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह संजय कदम शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असून शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांना हा मोठा धक्का असल्याचं बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आपण लवकरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. शिवसैनिकांच्या आग्रहास्तव आपण प्रवेश करत असून या मतदारसंघात पुढचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असल्याचे संजय कदम म्हणाले आहेत. रामदास कदम यांना शिवसेनेने भरपूर काही दिलं, मंत्रीपदं दिली तरी देखील ते स्वार्थासाठी तिकडे गेले. भाजपकडून आणि शिंदे गटातून आपल्या मुलाला मंत्रिपद मिळेल, आपल्याला नेतेपद मिळेल यासाठी रामदास कदम शिंदे गटात गेल्याचा आरोप संजय कदम यांनी केला. शिंदे गटात गेलेल्या आमदार योगेश कदम यांच्यासह राज्यातील 40 उमेदवारांना पराभव पत्करावा लागणार आहे, असा दावा संजय कदम यांनी केला. गुहागर विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा आमदार निवडून येईल अशी वल्गना करणाऱ्या रामदास कदम यांनी गुहागर मधून निवडणूक हरल्यानंतर तब्बल 14 वर्षांनी पाऊल ठेवले, असा घणाघात संजय कदम यांनी केला. गुहागरमध्ये माझे असंख्य कार्यकर्ते आहेत, गुहागर विधानसभा मतदारसंघावर देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच उमेदवार असलेले भास्कर जाधवच निवडून येतील आणि तेही एक लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास देखील माजी आमदार संजय कदम यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.