नवी दिल्ली, 10 जानेवारी : शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोगातल्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा बॉम्ब टाकला आहे. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपदच बोगस आहे, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगातल्या सुनावणीवेळी केला. महेश जेठमलानी यांनी शिवसेनेची घटना तसंच पक्षाची रचना काय आहे? हे निवडणूक आयोगाला सांगितलं. संघटनेची जुनी घटना, नवीन घटना आणि पक्षाची रचना यावर युक्तीवाद केला. ‘शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रीत होती, पण नंतर ती न बदलत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असे नाव स्वत:साठी घेतले, पण त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. बाळासाहेबांचं निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे सगळे अधिकार घेणार बदल केले. शिवसेनेच्या घटनेत बदल करणं हा बोगसपणा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपदच बेकायदेशीर आहे,’ असा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे महेश जेठमलानी यांनी केला आहे. आज कुणीही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, त्यामुळे शिवसेना धनुष्यबाण कुणाचे? हे ठरवण्यात काहीच अडथळा नाही. आमदार आणि खासदार यांच्या संख्येनुसार एकनाथ शिंदे गट बहुसंख्येत आहे. बहुसंख्येकडे नेणारी ही आकडेवारी महत्त्वाची आहे. राजकीय पक्ष म्हणून कायद्यात जे निकष आहेत, त्या सगळ्या निकषांवर एकनाथ शिंदे सरस आहे, असं महेश जेठमलानी म्हणाले. दरम्यान निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असतानाच संजय राऊत बाहेर पडले. कायमच पत्रकारांशी संवाद साधणारे राऊत निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून काहीही न बोलता निघून गेले, त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरेंचा युक्तीवाद उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कपील सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगाने सुनावणी घेऊ नये. किंवा मग आम्हाला सांगा की हा युक्तीवाद प्राथमिक आहे का अंतिम आहे? त्यानुसार आम्ही युक्तीवाद करू. सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना अपात्र ठरवलं तर या आयोगाने दिलेला कोणताही निर्णय हास्यास्पद होईल, असं कपिल सिब्बल म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.