रत्नागिरी, 10 जुलै : शिवसेनेचे सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी उदय सामंत यांचा रत्नागिरीचा (Ratnagiri) उपरा आणि केसरकर यांना सिंधुदुर्गाचा (Sindhudurg) बडगा असा उल्लेखल केला. “रत्नागिरीचा उपरा आणि सिंधुदुर्गातील तो बाडगा. दोन्ही शिवसेनेचे बागडा आणि कोडगा. शिवसेनेशी बंडखोरी केलीत आणि बेशरमपणे सांगतायत आम्ही शिवसेनेचे आहोत. काल परवा आलेले म्हणतायत मला शिवसेना वाचवायची आहे. रत्नागिरीत असं कारटं जन्माला यावे याची मला लाज वाटते. गद्दाराची व्याख्या म्हणजे एकाच्या घरी नांदायचे दुसऱ्याचे मंगळसुत्र घायलायचं, तिसऱ्याच्या घरी संसार करायचा आणि गर्भ चौथ्याचा वाढवायचा”, असा घणाघात विनायक राऊतांनी केला. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी खूप जवळ केलं. मातोश्रीवर तुम्हाला रश्मी वहिनींनी अन्न देखील खायला घातलं. राजन साळवी यांना मंत्री नाही केलं. पण तुम्हाला मंत्रीपद दिलं. सात वर्षाचे तुमचं शिवसेनेतलं आयुष्य.खोऱ्यांनी फावड्यांनी ओढलात तेव्हा तुम्हाला नाही विचारलं. तुम्हाला मंत्री केलं. आदित्य ठाकरे यांनी सर्वात जास्त विश्वास तुमच्यावर ठेवला. उदय सामंत तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्हाला आदित्य यांनी भरवले. तुम्ही अन्नाची किंमत का नाही ठेवली? तुम्ही कृतघ्नपणा का केला? माणुसकीला काळीमा फासणारा राजकीय स्वार्थी माणूस या नररत्नाच्या खाणीत निर्माण झाला. बाबासाहेब तुम्ही लिहलेलं संविधान मोडलं जातंय, तोडलं जातंय”, अशी टीका विनायक राऊतांनी केली. ‘तुम्ही तुमच्या आईला विकायला निघालात’, राऊतांची टोकाची टीका “पाच हजार कोटींच्या बॅगा भरायच्या आणि महाराष्ट्रात यायचं. प्रत्येकाचा खोका पन्नासचा, आत्तापर्यंत आंब्याचा खोकाच फक्त आपल्याला माहिती आहे. तुम्ही विका आणि खानदान विका, तुम्ही तुमच्या आईला विकायला निघालात. तुम्ही विकला गेलात 40 च्या जागी आम्ही 100 उभे करू. शिवसेनेला नष्ट करणाऱ्या भाजपला तुम्ही साथ देतायत”, असा घणाघात राऊतांनी केला. “तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप केलाय. आम्हाला अभिमान औरंगाबादचे नाव संभाजीनगर केलं. उस्मानाबादचे नाव धारशीव केलं. महाविकास आघाडीतील कुणी विरोध केला नाही. भाजप कोरोना काळात आपल्या महाराष्ट्रातील लोकांच्या मरणावर टपली होती”, अशी टीका त्यांनी केली. ( …तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागेल? विधानसभा उपाध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टात जवाब दाखल, बंडखोरांच्या अडचणी वाढणार? ) “उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करतायत निधी दिला नाही. ५ हजार ८६८ कोटी एवढा निधी महाविकास आघाडीनं दिलेला आहे. एकनाथ शिंदे ३६५ , उदय सामंत २२१ कोटी एवढा निधी दिला. महाराष्ट्रातील अशी अनेक बंड शिवसेनेनी पाहिली”, असं विनायक राऊत म्हणाले. “शिवसेना पक्ष प्रमुखांचा धनुष्यबाण हिस्कावून घेण्याची ताकद नाही. माझं इमान कायम, देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आमचा देह मतोश्री चरणी. खोक्यासाठी आम्ही गद्दारी करणार नाही. उद्धव ठाकरे यांना चिकटलेली गोचिड मुक्त झाले. सासूरवास आम्ही भोगत आलोत. यांचे बोलवते धनी दिल्लीत आहेत. शिवसेना संपवण्याचा कटात तु्म्ही सहभागी, तुम्ही या पापात सहभागी त्यामुळे तुमची त्यावेळची जागा नरकात. उद्धव ठाकरे यांनी वर्षाचा त्याग केला त्यावेळी सर्वच जण भावुक झाले. पापाचे वाटेकरी तुम्ही उदय आणि तुमचे ४० आमदार”, अशी टीका विनायक राऊतांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








