मुंबई, 18 जुलै: राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. शंकरराव गडाख यांची पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री गडाख यांचाही स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे. आता गडाखांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा...धक्कादायक: मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण महिलेवर अतिप्रसंग
दरम्यान, शंकरराव गडाख हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील आमदार आहेत. गडाख यांचं गाव असलेले नेवासे तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सोनईसह परिसर सील करण्यात आला होता. स्वत: शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गावात विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने 11 पथके कार्यरत केले असून परसरात तपासणी करण्यात येत आहे.
सोनई 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट जाहीर...
सोनई गावात एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण गाव सध्या 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गावकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनांचा आढावा घेतला होता.
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय-89) यांचा कोरोना रिपोर्ट यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पुढील उपचारासाठी निलंगा (जि. लातूर) येथून पुण्यात हलवण्यात आलं आहे. राज्यात सगळ्यात आधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आता हे नेते कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा...ST महामंडळानं घेतला मोठा निर्णय, लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ!
अशोक चव्हाण यांनी केली कोरोनावर मात...
याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशोक चव्हाण यांना उपचारासाठी नांदेडवरुन मुंबईला हलवण्यात आलं होतं. उपचार घेतल्यानंतर काही दिवसांतच अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर त्यांना 4 जूनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.