उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार? काय म्हणाले संजय राऊत

उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार? काय म्हणाले संजय राऊत

उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी द्यायची की नाही, विषय हा मुख्यमंत्र्यांच्या आखत्यारित

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर: राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांवर सध्या महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)यांना शिवसेनेच्या (Shivsena) कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे.

खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery) यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा...रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याचा प्रताप,बनावट आदेश दाखवून ठेकेदाराला 3 कोटींना लुटले

संजय राऊत म्हणाले की, 'उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी द्यायची की नाही, विषय हा मुख्यमंत्र्यांच्या आखत्यारित आहे. कॅबिनेटचा हा निर्णय आहे. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील, असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या संपर्कात?

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला यांचा दारूण पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे उर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर उर्मिला या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहेत. त्यात आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकरशी चर्चा केल्यानं त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चेच्या फैरी सुरू आहेत. 12 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसमध्ये अनेक जण आमदारकीसाठी इच्छुक आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी काँग्रेसची बुधवारी रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती. काँग्रेसकडून 3 जणांची नाव पाठवली जाणार आहे. यात उर्मिला मातोंडकर, सत्यजित तांबे आणि नसीम खान खान यांच्या नावाची चर्चा आघाडीवर होती.

पण, उर्मिला मातोंडकर यांच्या जागी नगमा यांच्या नावाबद्दल चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर माणिक जगताप, रजनी पाटील, मुझप्फर हुसैन यांच्या नावावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच चंद्रपूर येथील अनिरूद्ध वनकर यांना काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त जागेत संधी मिळेल असं बोललं जात आहे. त्यामुळे पडद्यामागे आणखी घडामोडींना वेग आला आहे.

दुसरीकडे, भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार होतील, अशी चिन्ह आहेत.

हेही वाचा...मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले, तुमची थोबाडे बंद का? सेनेचा भाजपवर हल्लाबोल

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जाणारे मिलिंद नार्वेकर हेदेखील विधिमंडळात दिसू शकतात. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत शिवसेनेकडून त्यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी माघार घेणाऱ्या माजी आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनाही शिवसेनेकडून संधी दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 30, 2020, 1:34 PM IST

ताज्या बातम्या