सिल्लोड, 19 नोव्हेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात आली. मागच्या काही दिवसात अब्दुल सत्तार वादात सापडले होते. त्यांच्याकडून सातत्याने ठाकरे गटावर टीका केली जात होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज सिल्लोडमध्ये सुषमा अंधारे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना अंधारे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
भावाला बोलायला त्याच्या भाषेत बोलाव लागेल, असं हिंदित बोलत अंधारे यांनी भाषणाला सुरुवात केली. जर तुम्ही सत्तारांना हिंदूत्वासाठी घेऊन गेले तर जेव्हा तुम्ही गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा सत्तार कुठे होते?तुम्हाला इस्लाम काय आहे कळतो का? असा प्रश्न विचारत इस्लाम धर्माचे पाच फर्ज काय आहेत ते सांगितले. तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलताय तुम्ही काय इमानच्या गोष्टी करताय? अब्दुल भाईला बोलायला पत्त्यांची भाषा लागते एकीकडे एक्का, दुसरीकडे छक्का. सिल्लोड ते औरंगाबाद रोड काचेसारखा आहे म्हणून मला वेळ लागला असा टोलाही अंधारे यांनी लगावला.
अब्दुलभाई तुम्ही घरवालीचे तरी आहात का? : अंधारे
कधी कधी संशय येतो, अब्दुलभाई तुम्ही घरवालीचे तरी आहात का? सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने अब्दुल भाई लोक तुमची लायकी ठरवतात. त्यांना काही फरक पडत नाही. जे लोक जितेंद्र आव्हाड यांच्यावर केस दाखल करतात, तेच लोक सत्तार आणि गुलाबरावांना गुळगुळीत भाषेत समजावतात. देवेंद्र फडणवीसांना हे कळत नाही, की ते पक्षाचे नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. कधी कधी वाटत देवेंद्र फडणवीस यांना ठरवून बोलायला सांगत असतील.
वाचा - Chandrakant Khaire : सत्तार हा हिरवा साप त्याला आम्ही ठेचणार, ठाकरे गटाच्या नेत्याकडून जहरी टीका
निकृष्ट दर्जाचे शिधा किट देऊन जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचे काम : अंधारे
शिधा कीटमध्ये जे तेल दिलं त्यातील गुलगुले तुम्ही खाल का? निकृष्ट दर्जाचे शिधा किट देऊन जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचे काम केलं. सत्तार हिंदू म्हणवतात तर सिल्लोडमध्ये हिंदू स्मशानभूमीला जागा का मिळत नाही? सत्तार तुम्ही डोक्यावर जी गांधी टोपी घालता त्याचा अपमान करत आहात. खोट बोलणं ही सत्तारांची फितरत आहे. तुम्ही टीव्हीवर म्हणता राजीनामा देतो अणि सभा असली की परवानगी नाकारुन पळ काढता. तुम्ही सांगितले तर मी एकटी येऊन बोलायला तयार आहे. ज्याला शेतीतील काही कळत नाही, असा कृषीमंत्री असतो का?
मोदीजी थापा मारण्यात नंबर एक : अंधारे
महागाई किती वाढली आहे, हे मोदींना सांगायची गरज आहे. सरकारी कंपन्या ठरवून बंद करण्याचं पाप मोदीजी करत आहेत. मोदीजी केव्हाही सत्तर साल म्हणतात तर एकनाथ शिंदे म्हणतात हे आधीच्या सरकारमुळे गेलं. मोदीजी थापा मारण्यात नंबर एक, हे पण आम्हाला थापा देतंय, असं म्हणत अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हे राजकारण पहिल्यांदा झालं. याआधी एकाही सरकारने असे केले नाही. मोदींना फोटोचा खुप नाद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shivsena