मुंबई, 24 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईच्या काळाचौकी येथील शिवसेना शाखेचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं. यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. तुम्ही कसले मर्द, तुम्ही वडील चोरायला निघालेत, तुम्ही दरोडेखोर आहात, अशा खोचक शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केली. तसेच निवडणुकीच्या प्रचाराला शिवसेना प्रमुख म्हणजे माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न घेता आपल्या आई-वडिलांच्या नावाने मतं मागा, असंदेखील आव्हान उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिलं. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? “५६ वर्षांपूर्वी शिवसेना स्थापन केली तेव्हा हाच तो परिसर आहे. या मनगटात ताकद ज्या शिवसेनेने दिली ते आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांचे जे करता करविते आहेत, महाशक्ती, म्हणजे कळसुत्री बाहुल्यांचे संचालक. त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यांना मुंबईवरचा भगवा झेंडा उतरवायचा आहे आणि आपला ठसा उमटवायचा आहे. आजपर्यंत संकटं अनेक आली, पण ज्यावेळेला संकटं आली त्या त्या वेळेला संकटांना गाळून शिवसेना जोमाने उभी राहिलेली आहे. अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आता जो प्रयत्न आहे तो शिवसेना संपवण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात घ्या. कारण जे सगळे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. हे जे फुटलेले आहेत त्यांना कुठल्याना कुठल्या पक्षात जाण्याखेरीज पर्याय नाही. आणि कुठल्या पक्षात जाणार आहेत? त्यांना काल एका पक्षाने ऑफर दिली आहे. किती जणांचा केमिकल लोच्चा झाला असेल सांगता येत नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनादेखील टोला लगावला. ( ‘फडणवीस मला तुमचे सगळे प्रकरणं माहिती’, संजय राऊतांचा मोठा इशारा ) “त्यांना एकतर शिवसेना संपवायची आहे. जोपर्यंत ठाकरे आणि शिवसेना आहे तोपर्यंत हे नातं राहणार. तुमच्या कितीही पिढ्या तळपाताळातून आल्या तरी त्यांना गाडून हे नातं टिकणार. म्हणून त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नातं तोडायचं आहे. नातं जर तोडायचं असेल तर हे जे स्वत:ला मर्द समजत आहेत, बंडखोर ही बंडखोरी नाही हरामेगिरी, नमखहरामीपणा आहे. तुमच्यात एवढी मर्दांगी असेल तर माझ्या वडिलांचा शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा. प्रत्येकाला आई-वडिल जीवापेक्षा प्यारे असतात. कारण आपण सुसंस्कृत माणसं आहोत. जे फुटून गेले आहेत, सुदैवाने ज्यांचे आई-वडील त्यांच्यासोबत आहेत, त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना घेवून सभा घ्याव्यात आणि मते मागावीत. तुम्हाला पक्षही चोरायचा आहे, तुम्ही वडील चोरायला निघालेत? कसले मर्द तुम्ही, तुम्ही दरोडेखोर आहात. अशा लोकामंमध्ये तुम्ही महाराष्ट्र, मुंबई देणार आहात का?”, असा सवाल ठाकरेंनी केला. ‘प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मला शपथपत्र पाहिजे’ “कोर्टात केस सुरु आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. मी त्याविषयी काहीच बोलणार नाही. पण त्यांनी आणखी एक शेपूट ओढली आहे. निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की, आमची शिवसेनाच खरी शिवसेना आहे. मग हे कोण आहेत? हे सगळं कारस्थान आहे. फक्त जल्लोषाने उत्तर देवून चालणार नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मला शपथपत्र पाहिजे आहे. सदस्य नोंदणी हवी आहे”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. ‘कोण कोणाबरोबर आहे कळतंच नाही’ “गेले बरेच दिवस अरविंद माझ्या मागे लागले होते की कार्यालयाचे उद्घाटन करायचं आहे. पण मी दुर्लक्ष करत होतो. हल्ली दिवस असे आले आहेत की आमदार-खासदार जे बोलतील ते ऐकावंच लागेल. याचं कारण नक्की कळतंच नाही कोण कोणाबरोबर आहे? आतासुद्धा अरविंद, अजय आणि सर्वजण मला माहिती आहे, विश्वास आहे, कितीही वादळ येतील किती झंझावात येतील, पालापाचोळा झडून जातील. पण शिवसेनेची मुळं घट्ट आहेत ते कोणीही छाटू शकत नाही. जे गेले आहेत त्यांचं कोणत्या भाषेत वर्णन करायचं? त्यांना गद्दार हे संपूर्ण जग बोलतोय. आणि काल त्यांनी विनंती केली आहे की कृपा करुन आम्हाला गद्दार बोलू नका. आम्ही नाही बोलत, तुमच्या कपाळावर तुम्ही स्वत:च्या हाताने शिक्का मारुन घेतलाय, तो बोलतोय. पण हा अभ्युदयनगर, लालबाग परळ विभाग कुठलाही शिवसैनिकांचा आहे, आता हळूहळू चित्र स्पष्ट झालं आहे”, असं ठाकरे म्हणाले. ‘ज्यांनी निवडून दिलं त्यांच्यासमोर यायला सुरक्षा लागते?’ “जे गेले आहेत त्यांच्याबरोबर एकही शिवसैनिक गेलेला नाही. त्यांना जे वाटलं होतं जिथे सत्ता असते तिथे शिवसैनिक येतं. पण तसं नाहीय. जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता असते. आता फरक बघा, दोन्ही आमदार-खासदार माझ्या उजवी-डावीकडे आहेत, जे गेलेत ते अशा गर्दीत शिवसैनिकांमध्ये असे मिसळून दाखतील का? पोलीस बंदोबस्त, कुणापासून, ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्यांच्यापासून? जे राबराब राबले, स्वत:ची घरे बघितली नाहीत, पण भगवा फडवण्यासाठी अक्षरश: स्वत:च्या कुटुंबाला निखाऱ्यावर ठेवून तुम्हाला निवडून दिलं त्यांच्यासमोर येताना तुम्हाला केंद्राची सुरक्षा लागत आहे. सीमा सुरक्षा दल, राखील सुरक्षा दल हे काय आयुष्य आहे? हे कोणते प्रतिनिधी आहेत?”, असे सवाल ठाकरेंनी केले. ’…तर भाजपच्या दगडावर अडीच वर्षांपूर्वीच शिंदूर लागला असता’ “शिवसैनिक जीवाला जीव देणारे आहेत. अजय चौधरी यांना विधीमंडळ गटनेता केलं आहे. 2019 साली आपले जेव्हा करार ठरले होते त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी आपल्याला जे मंत्रिपद नको होतं ते मिळालं. त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्या. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरल्याप्रमाणे केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. मनावर दगड ठेवून आज जे करायला लागलं आहे, आज कोणत्या तरी भाजपच्या दगडावर अडीच वर्षांसाठी सिंधूर लागला असता ना. आज तुमच्या मनावर एवढा दगड पडलेला आहे, मग तेव्हा का नाही सांगितलं की हे आमचं ठरलेलं होतं. काय-काय नाटकं केली? आधी जागा वाटप 50-50 टक्के ठरलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. एकतर आपल्याला जागा कमी दिल्या. ज्या जागा दिल्या तिथे बंडखोरी केली. त्या जागा पाडल्या. नंतर शब्द मोडला. शिवसेनेचा मुख्यमंत्री संभवच नाही. जे संभव नव्हतं ते संभमावी युगेयुगे कसं झालं? आता सामान्यातून पुन्हा असामान्य लोकं घडवायचे आहेत. शिवसैनिकांची ताकद असामान्य आहे. त्यांना कळलेलं नाही कोणत्या शक्तीशी पंगा घेतलेला आहे. ही स्वाभिमानाची ताकद आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.