शिर्डी, 25 जून : शिर्डीत गेल्या 15 दिवसांत किरकोळ पैशाच्या कारणावरून दोन खून झाल्याच्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिर्डी नगरपंचायत, शिर्डी पोलीस आणि साईबाबा संस्थानने संयुक्त कारवाई करत 60 बेघर लोकांना ताब्यात घेतले आहे. यात प्रामुख्याने पुरूषांचा समावेश असून यातील काही भिक्षेकरू, बेघर तसंच मजूर आहेत.
आज सकाळी 6 वाजेपासून भिक्षेकरूंची धरपकड सुरू करण्यात आली. मंदिर परिसर, बस स्थानक परिसर तसेच शहरातील विविध भागातून 60 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कामी शिर्डी नगरपंचायतचे एक पथक, पोलिसांचे पथक आणि साईबाबा संस्थानचेही काही कर्मचारी मोहीमेत सहभागी आहेत.
या सर्व भिक्षेकरूंना ताब्यात घेतल्यानंतर संस्थानच्या वाहनातून त्यांना साई पालखी निवारा येथे नेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. मुंबई बेगर्स अँक्टनुसार, ही कारवाई करण्यात येत असन कोरोना संसर्ग लक्षात घेता सर्वांची आरोग्य तपासणी , जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, केंद्र शासनाने दिला महत्त्वाचा निर्णय
तपासणी पूर्ण झाल्यानंतर सर्वांना बेगर्स होममध्ये पाठवण्यात येणार असल्याचे शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.
शिर्डीत किरकोळ पैशावरून 15 दिवसात दोन खून झाले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शिर्डी परिसरात अनेक भिक्षेकरू आहेत. या सर्वांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. शिर्डीत वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही धरपकड मोहीम राबवण्यात आली असून आणखी भिक्षेकरूंना शोधण्याचे काम सुरू आहे.
जितेंद्र आव्हाडांनी अक्षय कुमारला फटकारलं; म्हणाले, तू न्यूजपेपर वाचत नाहीस का?
ही मोहीम यापुढे देखील सुरू ठेवणार असल्याचे सांगताना जे नागरिक भिक्षकरूंना अन्नदान करतात त्यांनी अन्नदान करू नये, अन्न मिळत असल्याने बाहेरील भिक्षेकरू देखील शिर्डीत गर्दी करतात त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन कोणीही करू नये अन्यथा कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी वाकचौरे यांनी दिली.
संपादन - सचिन साळवे