मुंबई, 28 नोव्हेंबर : संजय राऊत यांनी 2018 साली बेळगावात सीमावादावर भाषण केलं होतं. राऊत यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आता बेळगाव न्यायालयाने संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना महाराष्ट्रातले राजकारणी म्हणून पूर्ण संरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. या संदर्भात आम्ही कर्नाटक सरकारशी बोलू. आवश्यक ते स्टेटमेंट घेण्याचा त्यांना अधिकार आहे. पण संजय राऊत हे सीमा प्रश्नासंदर्भात बोलले त्यामुळे एका ज्येष्ठ नेत्यावर कारवाई होणे चुकीच ठरेल. आमचे वैचारिक मतभेद जरूर आहेत, पण महाराष्ट्र म्हणून आम्ही एकच आहोत. प्रश्न समोपचाराने सोडावा पुढे बोलताना दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे की, सीमा प्रश्न समोपचाराने सोडवावा अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. तीच भूमिका कर्नाटक शासन सुद्धा स्वीकारेल अस वाटतं. सुरक्षा काढण्याचा आणि समन्स येण्याचा काडीमात्र संबंध नाही. दुसऱ्या राज्याशी आम्ही कधीही हातमिळवणी करणार नाही. दोन राज्यातील संबंध बिघडतील अशी कारवाई करण्यात येऊ नये, अशी आमची भूमिका आहे. हेही वाचा : संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार? न्यायालयाकडून पुन्हा समन्स उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दरम्यान यावेळी केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे. आयोध्येत जाणारा रथ कोणी अडवला हे सर्वांना माहित आहे, असं असताना मतांच्या राजकारणासाठी ज्या नेत्याने हा रथ अडवला त्यांच्या मुलाशी त्यांनी हातमिळवणी केली. इथेच खऱ्या अर्थाने बाळासाहेब यांच्या विचाराशी तडजोड झाल्याचा टोला केसरकर यांनी लगावला आहे. तसेच अशी विचारांशी तडजोड आम्ही कदापी मान्य करणार नाही असंही केसरकर यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : आतापर्यंत तुझी जबान गप्प का होती? महाजनांच्या ‘त्या’ आरोपांवर खडसे भडकले; एकेरी शब्दात सुनावले उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्यातील सभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटील दौऱ्यावर घणाघाती टीका केली होती. याला देखील केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही निवडून आलो की ते आम्हाला एकवीरा देवीच्या दर्शनाला घेऊन जात होते. तसंच आता आम्ही कामाख्या देवीला गेलो असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.